रायगड लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीसाठी सोडल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. हा निर्णय घेताना पक्षश्रेष्ठींनी स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना का लक्षात घेतल्या गेल्या नाहीत असा सवाल जिल्हा काँग्रेस कमिटीकडे करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अलिबाग येथील काँग्रेस भवनमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणीची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी मंत्री रवीशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माणिक जगताप, माजी आमदार मधुकर ठाकूर, माजी आमदार शाम सावंत, मुश्ताक अंतुले यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणे अपेक्षित होते. मात्र बैठकीच्या सुरुवातीपासूनच पदाधिकाऱ्यांनी लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडल्याबद्दल नाराजीचा सूर लावला. पक्षाच्या या निर्णयामुळे जिल्ह्य़ातील काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. तर हा निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक पदाधिकाऱ्यांची मते पक्षश्रेष्ठींनी जाणून घेणे आवश्यक होते. अशी मते या वेळी मांडण्यात आली.
    ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्ह्य़ातील काँग्रेस अडचणीत कशी येईल यासाठी कायम प्रयत्न केले, पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोटय़ा केसेस टाकल्या, पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, आघाडीत असूनही बंडखोरी करत काँग्रेसचे उमेदवार पाडले. अशा नेत्यांना निवडून द्या असे आम्ही कुठल्या तोंडाने सांगायचे असा सवाल जिल्हा काँग्रेस कमिटीकडे करण्यात आला. पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून शेवटी रामशेठ ठाकूर, मुश्ताक अंतुले आणि माणिक जगताप यांना हस्तक्षेप करावा लागला. आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय हा राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आल्या असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या राहुल गांधींना जर तुम्हाला पंतप्रधान करायचे असेल तर त्यांच्यासाठी आपल्याला आघाडीच्या उमेदवाराचे काम करावेच लागेल. त्यामुळे झालेगेले विसरून पक्षहितासाठी सर्वानी कामाला लागले पाहिजे असे त्यांनी सांगितले.      मात्र रायगडचा मतदारसंघ जर काँग्रेस राष्ट्रवादीसाठी सोडत असेल तर विधानसभा निवडणुकीत त्याची परतफेड राष्ट्रवादीने केली पाहिजे अशी मागणी या वेळी करण्यात आली. जोवर बॅरिस्टर अंतुले यांचा आदेश आल्यावरच आम्ही कामाला लागू असे सांगत काहीशा नाराजीतच ही बैठक पार पडली.  त्यामुळे येणाऱ्या काळात आघाडीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे यांना विरोधकांबरोबरच्या आरोपांबरोबरच काँग्रेसच्या नाराजीला सामोरे जावे लागणार आहे हे मात्र नक्की.