युतीच्या घोषणेनंतर भाजप, शिवसेनेशी असलेल्या आघाडय़ा तोडण्याचे काँग्रेस नेत्यांचे आदेश

रमेश पाटील, वाडा

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेना यांची युती झाली आहे. त्यानंतर लगेचच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी भाजप आणि शिवसेनेसोबतच्या ग्रामपातळीवरील आघाडय़ा तोडण्याचे आदेश दिले आहेत.

वाडा तालुक्यात पंचायत समितीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे. वाडा नगरपंचायतीत शिवसेना-काँग्रेस यांची आघाडी आहे. संसदीय पातळीवरील युती जाहीर झाल्यानंतर आघाडय़ा तोडण्याचे तातडीचे आदेश आल्याने वाडय़ातील कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तातडीची बैठक घेतल्या. यात गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवरील भाजप-शिवसेनेसोबतच्या आघाडय़ा तोडण्याचे आदेश देण्यात आले.

चार वर्षांपासून वाडा पंचायत समितीत भाजपने शिवसेनेला डावलून राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. यात सभापती आणि उपसभापती अशी दोन्ही पदे भाजपने मिळवली.

वाडा नगरपंचायतीत शिवसेनेने भाजपच्या कार्यकर्त्यांशी असलेले हेवेदावे पुढे करीत भाजपला दूर सारले आणि काँग्रेसशी जवळीक साधली.

वाडा नगरपंचायतीत शिवसेनेचा जनतेतून नगराध्यक्ष निवडून आला असला तरी पहिल्या वर्षी काँग्रेसशी आघाडी करून सेनेने उपनगराध्यक्षासह अन्य विषय समितीची सभापती पदे मिळवून भाजपला शह दिला. दुसऱ्या वर्षीही भाजपला जवळ न करता काँग्रेसला उपनगराध्यक्षपद बहाल करण्यात आले.

मात्र मुंबईत भाजप-शिवसेना युतीच्या घोषणेनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडय़ा संपुष्टात आणाव्या लागणार आहेत. गेली पाच वर्षे वाडा तालुक्यातील भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांची दुभंगलेली मने येत्या लोकसभा निवडणुकीत एकत्र येतील की नाही, अशी शंका तालुक्यातील कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.

भाजप-शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर असलेल्या आघाडय़ा तोडण्याचे लेखी आदेश आलेले नाहीत. तरीही बैठकीत जर काही निर्णय झाला असेल तो अमलात आणू.

– अमिन सेंदु, वाडा शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतांची अधिक गरज भारतीय जनता पक्षाला आहे. ते ओळखून त्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेशी संबंध जोपासावेत.

-कैलास सोनटक्के, उप तालुका प्रमुख शिवसेना, वाडा.