मराठवाडय़ातील दुष्काळावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने सर्व पदाधिकारी आणि मराठवाडय़ातील नेत्यांची उद्या,  सेमवारी औरंगाबादेत बैठक बोलावली आहे.
मराठवाडय़ात कोरडा दुष्काळ असून राज्यातील अनेक भागात पाऊस आणि गारपीट झाली. राज्यात अजूनही अवकाळी पावसाच्या फटका बसतच आहे. हिवाळी अधिवेशनात सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली. मात्र, मदत जाहीर झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. शिवाय, पुन्हा अवकाळी पाऊस झाला. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने जिल्हास्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत. या समितीच्या अहवालात नमूद वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेवून सोमवारी मराठवाडय़ातील दुष्काळावर चर्चा केली जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली असून, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्ष उपनेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील अवकाळी पावसाचाही आढावा यात घेण्यात येणार आहे. राज्यातील आढावा घेतल्यानंतर काँग्रेस राज्य सरकारकडे आर्थिक मदत वाढवून देण्याची मागणी करण्याची शक्यता आहे.
मुंबईत प्रेरणा यात्रा
तब्बल पंधरा वर्षांनंतर विरोधी पक्षाची भूमिका बजावत असलेली काँग्रेस ९ जानेवारीला मुंबईत प्रेरणा यात्रा काढणार आहे. महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत भारतीयांच्या हक्काचा यशस्वी लढा दिला आणि ते भारतात परतले. हा ऐतिहासिक क्षण काँग्रेस गेट ऑफ इंडिया ते मंत्रालय, अशी पदयात्रा काढून साजरा करणार आहे.