सांगलीत काँग्रेसची राष्ट्रवादीवर टीका
काँग्रेस कार्यकर्ता हा जेवणावळीसाठी कधी भांडत नाही, तर सामान्य माणसाच्या हितासाठी कायम कार्यरत असतो असा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात लगावला. आगामी जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी जनतेच्या प्रश्नांवर कार्यकर्त्यांनी आक्रमक होण्याची गरजही त्यांनी प्रतिपादन केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुरुवारी झालेल्या मेळाव्यात झालेल्या हाणामारीचे पडसाद काँग्रेसच्या बठकीत उमटले. हा धागा पकडत कदम म्हणाले की, काँग्रेसचा कार्यकर्ता पक्षाने नेमून दिलेले काम करतो. तो जेवणावळीसाठी मेळाव्याला येत नाही. राष्ट्रवादीमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कालच्या घटनेतून आपली गुणवत्ता दाखवून दिली आहे. आमचा कार्यकर्ता हा पोट भरण्यासाठी नाही, तर सामान्यांसाठी काम करतो.
प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख म्हणाले की, सत्ताधारी भाजप केवळ शेतकऱ्यांना फसविण्याचा उद्योग करत आहे. पंतप्रधान केवळ परदेशवारीत गुंग आहेत. दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी या सत्ताधारी मंडळींना वेळ नाही. आघाडी शासनाने दुष्काळग्रस्तांसाठी १२ हजार कोटी रुपये खर्च केले. मात्र, आताचे शासन केवळ थापेबाजीत मग्न आहे. याचे उत्तर नजीकच्या काळात द्यावे लागणार आहे.
यावेळी बोलताना माजी आमदार सदाशिव पाटील यांनी सांगितले की, आज केवळ सत्तेसाठीच पक्ष ही कार्यकर्त्यांची मानसिकता बनत चालली आहे. मला काय मिळणार यापेक्षा समाजाला आपण काय देणार? याचा विचार घेऊन कार्यकर्त्यांनी कार्यरत राहिले पाहिजे.
नगण्य उपस्थिती
काँग्रेसने मोठा गाजावाजा करीत जिल्हा परिषद निवडणुकीला स्वबळावर सामोरे जाण्याची तयारी चालविली असली तरी पदाधिकारी वगळता केवळ उपस्थित कार्यकर्त्यांची संख्या शंभरच्या घरातही नव्हती. यामुळे हा मेळावा केवळ पदाधिकाऱ्यांसाठीच होता की काय? असा प्रश्न उपस्थित झाला.