कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी यासंबंधी आदेश दिला आहे. शिवाय, मराठा विकास प्राधिकरणासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली असून निधी राखीव ठेवण्यात आला आहे. कर्नाटक राज्यात तसंच खासकरुन सीमारेषेवरील परिसरात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजातील नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून आता भाजपा व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसत आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसने सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पांनी घेतलेल्या निर्णयाचा विरोध केला आहे. तर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील या निर्णयावरून निशाणा साधल्याचे दिसून आले होते. सीमावाद हा कर्नाटकसोबतचा मुद्दा आहे. मराठी भाषिकांना महाराष्ट्राचा भाग व्हायचं आहे. ५० कोटींचा निधी हे याचे निराकरण नाही. असं ते म्हणाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री भडकले; म्हणाले…

यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, ”काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये राहणाऱ्या मराठा बांधवांच्या हितार्थ त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी एका महामंडळाची घोषणा केली असून, त्यांच्यासाठी ५० कोटी रुपये केवळ जाहीर केले नाहीत तर त्यांचे वाटपदेखील केले आहे.

आज काँग्रेस पक्षाचे असलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांनी येडीयुरप्पा यांच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. सिद्धरामय्या म्हणाले की, कन्नड आणि मराठी लोकांमध्ये गेल्या काही काळापासून वाद सुरु असल्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी लोकांसाठी केलेले कोणतेही काम योग्य ठरणार नाही. सिद्धरामय्या यांच्या मते, यामुळे कन्नड लोकांच्या भावना दुखावल्या जातील. सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात देखील काँग्रेसचा मराठ्यांबद्दल असाच स्वभाव पाहायला मिळाला आहे. आधी सरकारने काही न काही घोळ करून आरक्षणात अडचणी निर्माण केल्या, त्यानंतर सारथीला नुकसान पोहोचवून अण्णासाहेब पाटील महामंडळसुद्धा बरखास्त करून टाकले. काँग्रेस पक्ष भले ही महाराष्ट्राचा असो किंवा कर्नाटकचा, दिल्लीचा असो वा इटलीचा… सर्वच भारत आणि भारतीयांच्या विकासाचा शत्रू आहे.

आणखी वाचा- ५० कोटींचा निधी हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरचे निराकरण नाही – नवाब मलिक

सिद्धरामय्या यांच्या या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते अगदी चिडीचूप मुक्या-बहिऱ्यासारखे पाहत राहतील. यांनी ना कधी मराठा समाजाच्या हिताचा विचार केला आहे आणि ना मराठा समाजासाठी काही चांगली गोष्ट केली आहे. सत्तेची लाचारी… काँग्रेस विचारांनीसुद्धा भ्रष्टाचारी !”

आणखी वाचा- …म्हणून परत एकदा फडणवीस सरकार पाहिजे – नितेश राणे

तर, अधिकृत आदेशानुसार, गेल्या कित्येक दशकांपासून कर्नाटक राज्यात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजाच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा विकास प्राधिकरणाचं मुख्य लक्ष्य समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक विकासाकडे असणार आहे, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले होते.