राज्यातच नव्हे तर देशभरात गाजलेला मराठा क्रांती मोर्चा उदयसिंग देशमुख उर्फ भय्यूजी महाराज यांच्या केंद्रस्थानी असल्याचे अनेकदा समोर आले होते. त्याबाबत त्यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. कोपर्डी घटनेत चिमुकलीवर होणारे अत्याचार धक्कादायक आणि पाशवी होते. ही सुरुवात असली तरीही मनात या सगळ्या गोष्टींबाबत खदखद होती. मराठा समाज अर्थिक संकटात सापडला आहे, या समाजाच्या मागण्या दुर्लक्षित आहेत. या समाजातील तरुणांना शिक्षण, नोकरी नाही असे ते म्हटले होते. अनेक वर्ष होऊनही मराठा समाजाच्या समस्या सुटल्या नाहीत तर त्या वाढत गेल्या. कोपर्डीची घटना निमित्त आहे, या घटनेने समाज जागा जाग झाला आणि एकवटला.

भय्युजी पुढे म्हणतात, सर्व पिडीत महिलांना न्याय मिळायला हवा, त्यासाठी मराठा समाज पुढे आला. एका मराठ्यात किती ताकद आहे हे सांगण्यासाठी एक मराठा लाख मराठी ही घोषणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनाही एका मराठ्यात कतृत्व जागविण्याची, हक्कांसाठी लढण्याची ताकद असायला हवी असे वाटत होते. त्याचप्रमाणे सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या मागण्यांसाठी लढाई उभारणे गरजेचे आहे. त्यामुळे ही घोषणा अतिशय नेमकी आहे असे भय्युजी यांचे मत होते. माझे अडनाव देशमुख असल्याने माझ्याकडे कायम त्या समाजाचे नेतृत्व करणारा म्हणून पाहिले गेले असेही ते या मुलाखतीत म्हटले होते.

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्युजी महाराज ओळखले जायचे. गुजरातमधले नरेंद्र मोदींचे सद्भावना उपोषण भय्यूजींच्या मध्यस्थीनेच सोडवण्यात आले होते. तर अनेकदा किचकट प्रश्न सोडवण्याकरता राजकीय नेते भय्यूजी महाराजांना मध्यस्थीची विनंती करायचे. अध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज यांच्या सर्वोदय परिवाराच्यावतीने अहमदनगरमधील कोपर्डी इथं बलात्कार पीडित चिमुकलीचं स्मारक बांधण्यात आले होते. महाराष्ट्रात मराठा मोर्चे निघत असताना त्यांच्यावर हल्लेही झाले होते. दोन वेळा प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार त्यांच्या चालकाने दाखल केली होती. या हल्ल्यामध्ये भय्युजी महाराज सुखरुप होते, तर कारचालक आणि सहकारी जखमी झाले होते.