सोशल मीडियावर होणाऱ्या महापुरुषांच्या विटंबनेनंतर शहर बंद ठेवण्याचे आंदोलन झाले. परंतु त्यामुळे सर्वानाच फटका बसला. या पाश्र्वभूमीवर ‘बंद’ ला यापुढे पायबंद घालण्याचा निर्णय उमरगा तालुक्याच्या मुरूम येथील व्यापारी महासंघाने घेतला आहे.
सोशल मीडियातून होणारी बदनामी, आक्षेपार्ह मजकूर, छायाचित्र, महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना आदी कारणांमुळे व्यापार बंद ठेवण्याचा प्रसंग सातत्याने ओढवत आहे. छोटय़ा-मोठय़ा कारणांवरून कोणीही पुढाकार घ्यायचा व शहर, बाजारपेठा बंद करण्याच्या प्रकारामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होते. शहरातील व्यवहार बंद पडून स्थानिक नागरिकांसह आसपासच्या गावांतून शहरात खरेदीस येणाऱ्या नागरिकांचीही मोठी गरसोय होते. त्यामुळे यापुढील काळात सततच्या ‘बंद’ ला पायबंद घालण्याचा एकमुखी निर्णय व्यापाऱ्यांनी बठकीत घेतला. त्यासाठी नूतन व्यापारी महासंघ स्थापन केल्याचे सांगण्यात आले. कुठल्याही कारणावरून शहरातील व्यापारपेठ बंद ठेवायची की नाही, याचा निर्णय यापुढे महासंघ घेणार आहे. बठकीस रुपचंद कारडामे, प्रकाश बाबशेट्टी, संजीव टेकाळे, अविराज मुंडासे, धनराज धुम्मा, सलीम बागवान आदी उपस्थित होते.
महासंघाची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी अशोक मिनियार, उपाध्यक्ष हुसेन चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, सचिव राजेश्वर मुदकण्णा, कार्याध्यक्ष दत्ता ढाले, सहकार्याध्यक्ष भीमराव फुगटे, तर नंदू कारंडे, शंकर सोलापूरे, सुभाष कटाळे, रवींद्र ख्याडे, अण्णाराव बिराजदार, बशीर जमादार, हुकूम कौलकर, विनोद गायकवाड, राजू हातशेट्टी आदींची सदस्य म्हणून निवड झाली.