तारापूरमधील प्रदूषण रोखण्यासाठी नियंत्रण मंडळाच्या उपाययोजना; महिन्याभरात अंमलबजावणी करण्याचे उद्योगांना आदेश

पालघर : प्रदूषण रोखण्यासाठी काही महत्त्वपूर्ण तांत्रिक बदल करण्याच्या सूचना राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने  तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये सर्व उद्योगांना केल्या आहेत. महिनाभरात हे बदल करण्याचे सूचित केले असून ते न केल्यास कारवाई  करण्याचा इशारा मंडळाने दिला आहे.

लघु उद्योजकांना सांडपाण्यावर प्रक्रिया करणे सहज  शक्य नसल्याने सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रामार्फत एकत्रित प्रक्रिया करण्याची संकल्पना पुढे आली होती. मात्र तारापूर औद्योगिक क्षेत्रातील काही उद्योगांच्या बेजबाबदारपणामुळे  तसेच जाणीवपूर्वक प्रदूषण नियमांचे  उल्लंघन करत असल्याने त्याचा फटका सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर होत आहे.  त्यावर रोख लावण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही तांत्रिक बदल करण्याच्या सूचना तारापूरच्या सर्व उद्योगांना दिल्या आहेत. उद्योगांना  हे बदल २६ फेब्रुवारीपर्यंत अमलात आणण्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा मंडळाने दिला आहे.

उद्योगांकडे असणारे अधिक घातक घटकांच्या सांडपाण्याचे प्रमाण घोषित करून नव्याने सुचवलेल्या कार्य पद्धतीनेच सांडपाणी मुख्य जलवाहिनी सोडण्यात यावे. उद्योगातून निर्देशित केलेल्या पद्धतीने एकाच ठिकाणाहून सांडपाणी जलवाहिनेत सोडण्यात येत असल्याचे प्रमाणपत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ करून घेणे बंधनकारक  करण्यात आले आहे. त्याचबरोबर कंपनीच्या आवारात निर्माण होणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यावर कंपनीच्या आवारामध्ये केल्या जाणाऱ्या प्रक्रियेबाबत अंतर्गत तपासणी अहवाल सादर करण्याचेदेखील बंधनकारक केले आहे. या कार्यपद्धतीने अंमलबजावणी न करणाऱ्या उद्योगांना सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सांडपाणी सोडण्याची मुभा देण्यात येणार नसल्याचे या आदेशात स्पष्ट म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुचवलेल्या तांत्रिक बदलांमुळे प्रत्येक उद्योगांमधून विसर्ग होणाऱ्या सांडपाण्याची मात्रा व त्याचा दर्जा यावर ऑनलाइन पद्धतीने देखरेख करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबरीने यामुळे दोषी कारखान्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करणे सहज शक्य होणार असून त्यामुळे प्रामाणिकपणे आपल्या आवारामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा उद्योजक कारवाईच्या विख्यात भरडला जाणार नाही अशी शक्यता आहे.

ऑनलाइन पद्धतीने देखरेख

२५ घनमीटर प्रतिदिन पेक्षा अधिक सांडपाणी निर्मिती करणाऱ्या उद्योगांना ऑनलाइन (मॉनिटरिंग) देखरेख ठेवणारी यंत्रणा कार्यान्वित करावयाचे आहे.  पाण्यातील आम्लपणा, सांडपाण्याची मात्रा, त्यामधील प्राणवायूचे प्रमाण व तरंगणारा घनकचरा याच्या नोंदणी  बंधनकारक आहे.  पॉझिटिव्ह डिस्चार्ज पद्धतीने सांडपाण्याचे मोजमाप करून सोडावयाचे असून पाण्यातील तरंगणारा घनकचरा मुख्य सांडपाणी जलवाहिनी जाऊ नये म्हणून गाळणी (स्ट्रेनर) व नॉन रिटर्न वॉल (झडप) बसवण्याचे सक्तीचे केले आहे. या सर्व प्रणालीला सीलबंद करण्याचे  सूचित करण्यात आले आहे.