सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई:  बेपत्ता झालेल्या मुलीच्या शोधासाठी एका सहाय्य पित्याची अस्वस्थता वाढत असताना विरार पोलिसांनी मात्र असंवेदनशीलतेचं दर्शन घडवले. दहा दिवसांनंतर शोधासाठी निघालेल्या दोन पोलिसांनी मुलीच्या पित्याकडूनच प्रवासासाठी गाडी, मटणाचं जेवण आणि महागडय़ा हॉटेलात ओली पार्टी केली. हातावर पोट असलेल्या पित्याला यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

विरार पूर्वेला राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी २६ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे २८ ऑक्टोबरला अज्ञात तरुणाच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. मात्र, दहा दिवस पोलिसांनी काहीच तपास केला नव्हता. विरारमधील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी ही बाब साहाय्यक आयुक्त रेणुका बागडे यांना सांगितली. त्यांनी मुलीच्या वडिलांची भेट घेतली आणि प्रकरण गंभीर असल्याने तात्काळ पोलिसांनी तपासाचे आदेश दिले. दरम्यान, मुलगी कोल्हापूरला एका तरुणासोबत गेल्याची माहिती कुटुंबियांनी काढून दिली होती. त्यामुळे ५  नोव्हेंबर रोजी विरार पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी मुलीच्या वडिलांना घेऊन कोल्हापूरला गेले. मात्र जाण्यासाठी गाडीचा, जेवण, मटणाचा आणि मद्यपानाचा १५ हजार रुपयांचा खर्च मुलीच्या वडिलांकडून घेतला. पोलिसांनी मुलीला आणून आरोपी मुलाला अटक केली. मुलीचे वडिल आदिवासी समजातील असून त्यांचे हातावर पोट आहे. अशावेळी पोलिसांनी त्यांच्या मुलीचा तात्काळ शोध लावला नाही. उलट त्यांच्याकडून प्रवासाचा खर्च, गाडी, मटणाचं जेवण आणि मद्याचा खर्च घेतला असा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी तक्रार केली आहे.  याप्रकरणी माहिती घेऊन चौकशी केली जाईल, असे  पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी सांगितले.

पोलिसांना तपासकामी जो खर्च येतो त्याचा भत्ता शासन देतो. अशा प्रकारे फिर्यादीकडून जेवण, मद्य घेणे चुकीचे आहे. मी संबंधित पोलिसांवर कारवाई करतो.

सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार