प्रबोध देशपांडे, लोकसत्ता
अकोला शहरात करोनाच्या संसर्गाने  वेग धरला आहे. गेल्या २० दिवसांत करोनाबाधितांची मोठी संख्या नोंदवण्यात आली. दररोज सरासरी १० रुग्ण आढळून येत आहेत. राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. शहरात संशयितांकडून झालेल्या ‘लपवाछपवी’ च्या प्रकारामुळे समूह संक्रमण चांगलेच वाढले. त्यामुळे अकोलेकरांवरील चिंतेचे काळे ढग अधिक गडद झाले आहेत.

विदर्भात नागपूरनंतर अकोल्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. अकोला शहर करोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. अकोल्यात ७ एप्रिलला पहिला रुग्ण आढळून आला. पुढील ४० दिवसांत ही संख्या २२० वर पोहोचली. शहरात करोनाची लागण झाल्यावरही अगोदरच्या काही दिवसांमध्ये रुग्ण संख्या स्थिर होती. मात्र, २८ एप्रिलपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली. गेल्या २० दिवस सलग मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात करोना दाखल झाल्यावर पहिल्या २० दिवसांमध्ये रुग्ण संख्या १७ होती, पुढच्या २० दिवसांमध्ये त्यात तब्बल २०३ रुग्णांची भर पडली. १६ मेपर्यंत जिल्ह्यात एकूण २२० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

शहरातील बैदपुरा, मोहम्मद अली रोड, मोमीनपूरा, कृषी नगर, न्यू भीमनगर, सिंधी कॅम्प, जुने शहर आदी भागांमध्ये रुग्ण अधिक संख्येने आढळून आले. करोनाने शहरातील बहुतांश परिसर व्यापून घेतले आहेत. बाधित भागांमध्ये रुग्ण संख्येत मोठी भर पडत गेली. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून हे क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात संशयितांनी स्वत:हून पुढे येत प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी भीती व धास्तीमुळे लपवाछपवीचे प्रकार केले. आजार व लक्षणांची माहिती दडवून ठेवल्या गेली. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर ते समोर येत गेले. त्यामुळे समूह संक्रमण वाढून रुग्ण संख्येत अत्यंत वेगाने वाढ होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवण्यात अद्यापही यश आलेले नाही. या प्रकारामुळे अकोलेकरांची चिंता चांगलीच वाढली आहे.

आणखी दोन महिला रुग्णांची भर
सायंकाळी प्राप्त अहवालानुसार, शनिवारी आणखी दोन महिला रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २२० झाली असून, आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १०० जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या १०३ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज करोनाबाधित आढळलेल्या दोन महिला २१ व २२ वर्षांच्या असून, एक फिरदोस कॉलनी, तर दुसरी लकडगंज भागातील रहिवासी आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

अकोल्यात ७.२७ टक्के मृत्यूदर
अकोला जिल्ह्यात १६ मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार ७.२७ टक्के करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा मृत्यूदर ३.६७ टक्के असून, त्या तुलनेत अकोल्यातील मृत्यूचे प्रमाण दुप्पटीच्या जवळ आहे. १३ एप्रिल रोजी शहरात करोनाचा महिला बळी गेला. त्यानंतर २८ एप्रिल ते १५ मेपर्यंतच्या कालावधीत १५ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील करोनाग्रस्तांच्या मृत्युची एकूण संख्या १७ असून, एक आत्महत्या वगळता करोनाने आतापर्यंत १६ जणांचे बळी घेतले. यातील बहुतांश रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा करोना तपासणी अहवाल सकारात्मक आला.

करोना संदर्भात युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. काही विशिष्ट भागांमध्येच करोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यावरही लवकरच नियंत्रण येईल. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये इतर आजारांचे प्रमाण जास्त होते. करोनाविरूद्धच्या लढ्यात नागरिकांनी काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.
– जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, अकोला.