नीरज राऊत

शहरबात

फेब्रुवारी २०२१ महिन्यात दर आठवडय़ाला ६०-७० नवीन रुग्ण आढळत होते. मार्च महिन्यात दर आठवडय़ाला रुग्णवाढीची संख्या दुप्पट होऊ लागल्याने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात परिस्थिती हाताबाहेर जाईल याचा अंदाज जिल्हा प्रशासन तसेच केंद्रीय टास्क फोर्स समितीला आला होता. या आजारात हॅप्पी हायपॉक्सिया अर्थात शरीरातील प्राणवायूचे प्रमाण खूप कमी झाल्यानंतर देखील श्वास घेण्यास त्रास न होणे व रुग्ण सामान्य दिसत असल्याने अनेक गृह विलगीकरणात असलेले रुग्ण अचानक गंभीर झाले. त्याच बरोबरीने आपल्याला साधा सर्दी-खोकला असल्याचा फाजील आत्मविश्वास बाळगणाऱ्या रुग्णांनी योग्य उपचार न घेणे किंवा खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून उपचार घेताना करोना तपासणी करण्याचे टाळल्याने अनेक रुग्ण गंभीर झाल्याचे दिसून आले आहे.

शासकीय उपचार व्यवस्थेच्या मर्यादा असताना तसेच जिल्ह्यत खासगी रुग्णालयात खाटा मिळत नसल्याने गृह विलगीकरणात असणाऱ्या रुग्णाने आजाराचा प्रसार केला. त्याचबरोबरीने हळद-लग्न व इतर समारंभ धुमधडाक्यात साजरा करणाऱ्या तसेच शासनाने घातलेल्या र्निबधाचे व सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमुळे एप्रिल महिन्यात करोना संसर्गाची लाट उसळली व ग्रामीण भागातील करोना झालेल्या रुग्णांच्या संख्येने १६ हजारचा  टप्पा गाठला. याच महिन्यात ग्रामीण भागात १६४ मृत्यू झाले. रेमडेसिविर व प्राणवायूचा तुटवडा तसेच उपचारासाठी रुग्णालयात जागा मिळविताना होणाऱ्या त्रासामुळे भीतीचे वातावरण पसरले.

जिल्ह्यत फक्त दीडशे आरटीपीसीआर नमुने तपासण्याची व्यवस्था असल्याने मुंबईतील शासकीय प्रयोगशाळेत नमुने तपासून येण्यास विलंब लागत असल्याच्या मर्यादा पुढे आल्याने आजारावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते. जिल्हा प्रशासनाने या मर्यादा लक्षात घेऊन जिल्ह्यातील ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र, नऊ दवाखाने, ३०६ उपकेंद्र यांच्यासह १८ पथके व ३९ भरारी पथकांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आजाराविषयी व तपासणीविषयी जनजागृती करणे तसेच प्रतिजन तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतल्या. मार्च महिन्यातील घेतलेल्या १५ हजार २५१ नमुन्यांच्या तुलनेत एप्रिल महिन्यात ६३ हजार ४६८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे त्यापैकी निम्म्याहून अधिक तपासणी प्रतिजन चाचण्यांच्या  माध्यमातून करण्यात आल्याने अनेक ठिकाणी व विशेषता दुर्गम भागात असलेल्या रुग्णांचे निदान लवकर होऊन त्यांना औषधोपचाराखाली आणता  आले. सर्व आरोग्य संस्थांमध्ये ताप निदान केंद्र (फिवर क्लिनिक) कार्यरत करून प्रतिजन तपासणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करणे हे आजाराच्या निदानामध्ये महत्त्वपूर्ण ठरले आहे. लक्षण असणाऱ्या व ज्येष्ठ नागरिकांना करोना काळजी केंद्रामध्ये दाखल करून उपचार सुरू करणे तसेच लक्षण नसणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवून त्यांच्यावर आशा व अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून देखरेख ठेवून उपचार सुरू करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून दर आठवडय़ाला दुप्पट होणारी रुग्ण संख्या गेल्या दोन आठवडय़ापासून ४८०० च्या जवळपास स्थिरावली आहे.  लवकर उपचार सुरू केल्यास रुग्णांना गंभीर व्हावे लागणार नाही व परिणामी रेमडेसिविर व प्राणवायूची गरज भासणार नाही हे  जिल्ह्यने ओळखले, हे विशेष. काही खासगी वैद्यकीय व्यवसायिक करोना चाचणी न करता उपचार सुरू ठेवण्याच्या पद्धतीवर आळा घालण्यासाठी मृतांच्या वैद्यकीय परीक्षण (डेथ ऑडिट) करण्याचे जाहीर केले तसेच करोना काळजी केंद्रातील गंभीर होणाऱ्या रुग्णांकरिता करोना रुग्णालयात जागांचे आरक्षण करण्याचे निर्णय महत्त्वपूर्ण ठरले आहते.

जिल्ह्यतील लोकसंख्या पाहता तसेच करोना रुग्णवाढीने घेतलेली उसळी पाहता जिल्ह्यतील आरोग्य उपचार यंत्रणा पूर्णपणे हतबल झाली आहे. गंभीर रुग्णांसाठी उपचारासाठी जेमतेम दीडशे तर प्राणवायू पुरवठय़ाची सोय असणाऱ्या तीनशे-साडेतीनशे खाटा उपलब्ध असल्याने जिल्ह्यतील रुग्णांना खासगी महागडय़ा रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे अशा खासगी रुग्णालय, सिटी स्कॅन केंद्र, रुग्णवाहिका यांच्याकडून सर्वसामान्य नागरिकांची होणारी लूट रोखण्यास जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे. खाजगी रुग्णालयांना परवानगी देताना त्या ठिकाणी गरीब व गरजू नागरिकांसाठी जागा आरक्षित ठेवणे किंवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य सेवांतर्गत सेवा पुरविण्यास देखील जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे. जिल्ह्यतील करोना डॅश बोर्ड व हेल्पलाईन नाममात्र स्वरूपात राहिली असून हे काम राजकीय पक्ष व सामाजिक संस्थामार्फत केले जात आहे.  आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करत असले तरी करोना बाधित रुग्णांची होणारी परवड व नातेवाईकांची होणाऱ्या  हालअपेष्टा सोडवण्यासाठी प्रशासकीय व्यवस्था व लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत.

डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान दर महिन्याला ३०० करोना रुग्ण आढळणाऱ्या पालघरच्या ग्रामीण भागाने मार्च महिन्यात १६७८ तर एप्रिल महिन्यात १५ हजार ९३७ नागरिकांना करोना संसर्ग झाल्याचे अनुभवले. आजाराच्या पहिल्या लाटेत ऑगस्ट २०२० मध्ये ४६०४ रुग्ण तर सप्टेंबर महिन्यात ४७०४ रुग्ण या पहिल्या लाटेतील उच्चांकाच्या चौपट रुग्णवाढ व दीडपट मृत्यू ओढवल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली. अशा परिस्थितीत आजारावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपल्या मर्यादा ओळखून चाचण्यांवर भर देत लवकर निदान, लवकर उपचार हा मंत्र जोपासून आजार तसेच रुग्णवाढीचा वेग नियंत्रणात आणण्यात यश मिळवले आहे. तरीही बाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी परवड थांबवण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.