करोनाच्या रूपानं राज्य सरकारसमोर मोठं संकट ठाकलं आहे. राज्यात पहिला करोनाग्रस्त रुग्ण सापडल्यापासून राज्य सरकारची झोप उडाली असून, या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार प्रयत्नांची शर्थ करताना दिसत आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधून दिलासा देत आहे. सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी जनतेच्या मनात काय सुरू असेल हे बोलून दाखवलं.

रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संवाद साधताना जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं. त्याचबरोबर गर्दी कमी करण्यासाठी सरकारनं काही कठोर पावलं उचलतं असल्याचं सांगून राज्यातील नागरी भागात जमावबंदी आदेश लागू करत असल्याची घोषणा केली होती.

सोमवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारनं घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली. त्याचबरोबर करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

सुरूवातीलाच मुख्यमंत्री म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांपासून मी सातत्यानं टिव्हीवर दिसत आहे. त्यामुळे आता तुमच्या मनात विचार येत असेल की, आला बाबा हा पुन्हा, आता काय सांगतो काय माहिती?,’ असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी मुख्य विषयाला हात घातला.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

‘कोरोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे , मी सर्वांना काळजीपोटीच या सुचना देतो आहे. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगात होते आहे तसे थैमान होईल. काल राज्यात १४४ कलम लावले होते आता मला राज्यात संचार बंदी लावावी लागते आहे. खासगी वाहने अत्यावश्यक कारण असेल तरच सुरु राहतील. रिक्षा, टैक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल. काल आपण इतर राज्याच्या सीमा बंद केल्या होत्या आज आपण राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करीत आहोत. या वाहतूक बंदीत खासगी वाहने देखील असतील. देशांतर्गत विमानतळ तत्काळ बंद करावे अशी विनंती मी पंतप्रधानांना केली आहे. ही कठोर पाउले केवळ जनतेच्या हितासाठी आहेत,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.