News Flash

करोना बाधित रुग्णाचा आरोग्यमंत्री राजेश टोपेंना भेटण्याचा प्रयत्न

अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयातली घटना

अमरावतीत एका करोना बाधित रुग्णाने थेट आरोग्यमंत्री राजेश टोपेंना भेटण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हा रुग्ण थेट दाखल झाला. “मी करोना पॉझिटिव्ह आहे, मला कोविड रुग्णालयात बेड मिळत नाही त्यामुळे मला ही तक्रार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे करायची आहे. मला त्यांची भेट घेऊ द्या” असं या युवकाने सांगितलं. शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस आणि आरोग्य प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहण्यास मिळालं. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी अमरावतीतील कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर बचत भवन येथे लोकप्रतिनिधी आणि आरोग्य प्रशासनातील अधिकाऱ्यांची आढावा बैठकही झाली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद होती. त्याआधीच हा प्रकार घडला.

पत्रकार परिषदेच्या आधी एक युवक त्या ठिकाणी आला आणि आपण करोना पॉझिटिव्ह असून आपल्याला कोविड हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्याचा आरोप त्याने केला. आरोग्य मंत्र्यांना भेटून तक्रार करणार असल्याचे त्याने सांगितले. ज्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयात गाडगे नगर पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले. त्यांनी रुग्णाला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र या रुग्णाने जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या मारला. त्याने पोलिसांचे काहीही ऐकून घेतले नाही. याच दरम्यान कोविड हॉस्पिटलमधले कर्मचारी पीपीइ किट घालून तिथे पोहचले. संपूर्ण पत्रकार परिषद होईपर्यंत तो तरुण बाहेरच बसून होता. नंतर कशीबशी त्याची समजूत काढून त्याला कोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात नेलं. या सगळ्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचे रुप आले होते.

अमरावतीत करोनाचे एकूण १२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. यापैकी ८ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तीन हजार रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरु आहेत. अमरावतीत करोनाची बाधा होऊन आत्तापर्यंत २४० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 10:20 pm

Web Title: corona positive patients enters in collector office of amravati and try to meet health minister rajesh tope scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 आशा स्वयंसेविकांनी प्रस्तावित आंदोलन मागे घ्यावं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन
2 महाराष्ट्रात १७ हजार ७९४ नवे करोना रुग्ण, एकूण संख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा
3 ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे महाराष्ट्राचा हेल्थ मॅप तयार होण्यास मदत-मुख्यमंत्री
Just Now!
X