करोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फेसबुकच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रात सध्या काय स्थिती आहे, करोनाचा सामना करण्यासाठी आपण कशी तयारी करत आहोत याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

लॉकडाउनमुळे सध्या सर्वजण घरी आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्वांना घरच्या घरीच व्यायाम करण्याचा सल्ला दिला. “करोना विरुद्धची लढाई आपण जिंकणारच आहोत. पण त्यानंतर आपल्याला अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर एक युद्ध लढायचं आहे. ते एक मोठ जागतिक युद्ध असू शकतं. त्यासाठी आपण शारीरिक, मानसिक दृष्टया खंबीर असलं पाहिजे. अर्थव्यवस्थेच्या आघाडीवरील लढाईसाठी शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे” त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घरच्या घरी व्यायाम करण्याचा सल्ला दिला.

आणखी वाचा- तुमची महाराष्ट्राला गरज; निवृत्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन

करोनाग्रस्तांवर उपचारांसाठी तीन प्रकारची वेगवेगळी रुग्णालयं
ज्यांच्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे असतील त्यांच्यासाठी एक वेगळं हॉस्पिटल असेल. थोडया जास्त प्रमाणात करोनाची लक्षणे असलेल्यांसाठी दुसरे हॉस्पिटल असेल आणि ज्यांच्यामध्ये करोनाची अतीतीव्र लक्षणे आहेत तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह किडनी असे अन्य आजारही आहेत, त्यांच्यासाठी तिसरं रुग्णालय असेल. हे रुग्णालय अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असेल असे मुख्यमंत्री म्हणाले.