सांगली :  गृहविलगीकरणाच्या आग्रहामुळे सांगली जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत नाही. त्यामुळे गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक अलगीकरणावर भर देणे आवश्यक असल्याचे मत आरोग्य सल्लागार व माजी आरोग्य संचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केले.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी स्थिर असून पहिल्या तीन जिल्हयात सांगलीचा समावेश आहे. यामुळे आरोग्य सल्लागार डॉ. साळुंखे यांनी सांगलीमध्ये येऊन स्थितीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. र्मिंलद पोरे, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, आयुक्त नितीन कापडणीस आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते.

डॉ. साळुंखे यांनी यावेळी सांगितले,की जर करोना नियमांचे पालन झाले नाही तर सप्टेंबर, ऑक्टोंबरमध्ये करोनाची तिसरी लाट अटळ आहे. जास्तीत जास्त करोना चाचण्या, सहवासितांचा शोध, लसीकरण आणि नियमांचे पालनच या तिसऱ्या  लाटेला रोखू शकेल. जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्णसंख्या किती होती हे लक्षात घेऊन ऑक्सिजन, स्टिरॉईड, अनुषंगिक औषधे यांचा बफर स्टॉक ठेवा, असा सल्ला त्यांनी दिला.

जिल्ह्यात आरोग्याच्या पायाभूत सुविधा चांगल्या आहेत. संवाद यंत्रणा चांगली आहे. लोकांचा आरोग्य यंत्रणेबरोबरचा संपर्क चांगला आहे. कोविड कंट्रोल रूमची संकल्पनाही अत्यंत चांगल्या पध्दतीने राबविली जात आहे. या सर्व बाबी चांगल्या असल्या तरी जिल्ह्यातील करोना वाढीचा दर स्थिर असणे, रुग्णसंख्येत घट न होणे हे विषय अत्यंत चिंतेचे आहेत. लोकांची कोविड बद्दलची भीती कमी झाली असून कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक योग्य वर्तन प्रतिसाद कमी झाला आहे असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.