महाड तालुक्यातील बिरवाडी येथील एका ४५ वर्षीय महिलेचा मुंबईतील केईएम रुग्णालयात करोनाने मृत्यू झाला आहे. यामुळे तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.या महिलेचा करोनामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल केईएम रुगणालयाने दिल्यानंतर, बिरवाडी शहरातील प्रभाग पाच प्रतिबंधीत क्षेत्र (कँटोनमेंट) तर प्रभाग १,२,३,४, आणि सहा बफर झोन जाहीर करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली असल्याची माहिती महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी आज दिली. ही महिला महाड शहरातील ज्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी गेली होती, ते रुग्णालय तुर्तास बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

बिरवाडीतील ही ४५ वर्षीय महिला किडनीच्या आजाराने त्रस्त होती आणि गेल्या दोन वर्षांपासून डॉ. देशमुख यांच्या देशमुख नर्सिंग होममध्ये डायलिसीसचे उपचार घेत होती. रविवारी (२६ एप्रिल) या महिलेला अचानक दम लागण्यास प्ररंभ झाला. तिला तातडीने डॉ. देशमुख नर्सिंग होममध्ये आणण्यात आले. तेथे तिचा एक्सरे काढला असता न्युमोनियाची लक्षणे दिसल्याने डॉक्टरांनी तिला तातडीने मुंबईत हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला मुंबईत केईएम रुग्णालयात नेण्यात आले. २७ एप्रिल रोजी केईएम रुग्णालयात तिच्या दोन करोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी पहिली चाचणी निगेटिव्ह आली तर दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली. दरम्यान उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. मुंबईतच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

करोनाचा पॉझिटिव्ह अहवाल ग्राह्य धरीत प्रशासनाकडून बिरवाडी शहरातील ज्या प्रभाग पाचमध्ये ही महिला राहते तो प्रभाग पाच कँटोनमेंट एरिया (प्रतिबंधीत क्षेत्र) तर प्रभाग १,२,३,४ आणि ६ बफर झोन जाहीर करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. या प्रभागातील सर्व नागरिकांची वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे. तर कुटुंबातीलच सदस्यांसह रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टर मिळून, पतीच्या कंपनीतील तीन जण असे जे 17 लोक या महिलेच्या थेट संपर्कात आले होते, त्यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे.

महाड येथील देशमुख नर्सिंग होम तुर्तास बंद ठेवण्यात आले असून, तेथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे तपासणी अहवाल आल्यानंतर हा दवाखाना सुरू ठेवायचा की बंद याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती इनामदार यांनी दिली.यावेळेस महाडचे तहसिलदार चंद्रसेन पवार, महाड ग्रमीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बिराजदार आदि उपस्थित होते.