अटक केलेला वाहन चालक करोना बाधित निघाल्याने अलिबाग येथील स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाचे दोन अधिकारी आणि दोन कर्मचारी यांना अलगीकरणात ठेवण्यात आले होते. या चौघांनाही करोना विषाणूची बाधा झाली नसल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. चौघांचेही तपासणी अहवाल नकारात्मक आल्याने सर्व पोलीसांना मोठा दिलासा मिळाला आहे.

श्रीवर्धन मधील भोस्ते गावात एकाच कुटूंबातील पाच जण करोनाबाधित आढळून आले. प्रशासनाने केलेल्या चौकशीत हे सर्व जण ४ एप्रिलला खासगी वाहनाने श्रीवर्धनमध्ये दाखल झाल्याचे समोर आले. यानंतर टाळेबंदीच्या काळात खासगी वाहनाने या कुटुंबाला श्रीवर्धनमध्ये सोडणाऱ्या चालकांचा तपास पोलीसांनी सुरु केला होता. तेव्हा हा वाहन चालक मुंबईतील गोरेगावमधील असल्याचे निष्पन्न झाले. रायगडच्या स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाने त्याला ताब्यात घेतले.  यानंतर अलिबागला आणून त्याची सखोल चौकशी केली.

पोलीस चौकशीत त्याने आणखी ४८ जणांना जिल्ह्यात ठिकठिकाणी पोहोचवल्याचे समोर आले. एवढंच नाहीतर जेव्हा पोलिसांनी या वाहनचालकांची वैद्यकीय तपासणी केली तेव्हा त्यालाही करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले. यानंतर वाहनचालकांची चौकशी कऱणाऱ्या चारही अधिकाऱ्यांना अलगीकरणात ठेवण्यात आले होते. या चौघांची स्वॅब तपासणी करण्यात आली. मात्र चौघांनाही करोना बाधा झाले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागासह अलिबागकरांना मोठा दिलासा मिळाला. मात्र १४ दिवस या चौघांनाही अलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.