बीड : करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव ओसरू लागला आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१९ टक्के असले तरी मृत्युदर मात्र कमी होत नसल्याने चिंता कायम आहे. आतापर्यंत २ हजार ९५ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या मृत्युदर २.३६ टक्कय़ांवर गेला आहे. जिल्हा रुग्णालयात तीनशे रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी बहुतांश रुग्ण प्राणवायूवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बीड जिल्ह्यात बुधवारी नवीन १४६ बाधितांची नोंद झाली. अंबाजोगाई १३, आष्टी १६, बीड २२, धारुर १३, गेवराई ९, केज २६, माजलगाव १२, परळी १३, पाटोदा ११, शिरुर ८ तर वडवणी तालुक्यात तीन रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३०८ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव ओसरू लागल्याने टाळेबंदीत सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत शिथिलता देण्यात आली. रुग्ण कमी होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्राणवायुयुक्त खाटा, रेमडेसिविर इंजेक्शनची मागणीही घटली असून काही ठिकाणचे कोविड काळजी केंद्र बंद करण्यात आले आहे. रुग्णसंख्येत घट होत असली तरी मृत्युदर रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. चोवीस तासात सात बाधितांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण २.३६ टक्कय़ांवर गेले आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१९ टक्के असून आजपर्यंत २ हजार ९५ करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. जिल्ह्यात सध्या २ हजार १७० रुग्णांवर ठिकठिकाणच्या रुग्णालयात उपचार सुरू असून ७ हजार ७३५ खाटा रिकाम्या असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.