परप्रांतीय मजूर गेल्याने स्थानिक तरुणांकडे संधी असून त्यांनी ती सोडू नये असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी उद्योजकांनीही स्थानिक तरुणांना नोकरी दिली पाहिजे असा सल्ला दिला आहे. लॉकडानमुळे अनेक स्थलांतरित कामगार आपल्या राज्यात परतले आहेत. त्यामुळे लॉकडाउन उठल्यानंतर अनेक ठिकाणी कामगारांची गरज भासणार आहे. स्थानिक तरुणांसाठी ही सुवर्णसंधी असून त्यांनी ती सोडू नये असं आवाहन सुभाष देसाई यांनी केलं आहे. औरंगाबादमध्य ते बोलत होते.

“संकटासोबत संधीही असते, ती शोधावी लागते आणि साधावीही लागते. महाराष्ट्र सरकार यात मागे नाही. जे गुंतवणूकदार येत आहेत, ती गुंतवणूक परत जाऊ नये आणि महाराष्ट्रात राहण्याचा त्यांचा निर्णय कायम राहावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रस्ताव येत आहेत त्यांना अधिक सवलती देण्याचा प्रयत्न करत आहोत,” असं सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे.

“नवीन उद्योग सुरु कऱणाऱ्यांना तात्काळ महापरवाना दिला जाईल. कोणतेही परवाने मिळवण्यासाठी त्यांना थाबायची गरज नाही. काही मजूर, कामगार दूर गेले आहेत. ते कसे मिळतील अशी शंका व्यक्त केली जात आहे .त्यासाठी आम्ही राज्यात औद्योगिक कामगारांचं ब्युरो स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या कौशल्याप्रमाणे वर्गवारी करुन नोंदणी केली जाईल. कोणत्याही उद्योगाने मागणी केल्यानंतर एक आठवड्यात त्यांना कामगार पुरवले जातील,” अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे.