शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी करोनाचा प्रादुर्भाव, अनलॉक, लसीकरण, करोनाची तिसरी लाट अनेक विषयांवर मंगळवारी एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं. राज्यामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारसंदर्भातही आदित्य यांनी भाष्य केलं आहे. राज्यातील अनलॉकसंदर्भात बोलताना सर्व जिल्ह्यांचे पाच पद्धतीने वर्गीकरण करुन अनलॉक टप्प्याटप्प्यात होणार असल्याचं आदित्य यांनी स्पष्ट केलंय.

नक्की वाचा >> Explained: संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?

महाराष्ट्रामध्ये अनलॉकअंतर्गत अनेक शहरांमध्ये सोमवारपासून सूट देण्यात आलीय. मात्र दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. याचसंदर्भात एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला असता आदित्य यांनी करोना संपलाय असं आपण मानता कामा नये, अशी प्रतिक्रिया दिलीय. सध्या दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नाही केवळ रुग्णांचे आकडे कमी झाले आहेत. आपल्याला करोनाविरुद्धचा संघर्ष पुढील काही काळ कायम ठेवावा लागणार आहे. मात्र हा संघर्ष करताना आर्थिक उलाढाल आणि व्यवहारही सुरु राहिले पाहिजेत. त्यामुळेच अनलॉकदरम्यान लोकांनी मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करणं, हात धुणे यासारख्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, या साध्या साध्या गोष्टीच आपल्याला तिसऱ्या लाटेपासून दूर ठेवतील, असं आदित्य यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> केंद्राकडून महाराष्ट्राला २६ हजार ९५९ कोटी येणे बाकी; उद्धव ठाकरेंनी मोदींसमोर मांडला हिशोब

तिसऱ्या लाटेसाठी काय तयारी केलीय?

करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात बोलताना अदित्य यांनी तीन मुद्दे उपस्थित केले. “कॉर्परेट रिस्पॉन्स मेडिकल रिस्पॉन्स आणि सिव्हिक रिस्पॉन्सवर भर दिला जाणार आहे. मेडिकल रिस्पॉन्सअंतर्गत आम्ही महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये बेड्सची संख्या वाढवत आहोत. औषधे अधिक प्रमाणात उपलब्ध करुन देत आहोत. टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार आम्ही काम करत आहोत,” असं आदित्य म्हणाले. लहान मुलांवर तिसऱ्या लाटेचा परिणाम होण्याची भीती असल्याने मुलांसाठीही आम्ही खास व्यवस्था केल्याचं आदित्य म्हणालेत.

कॉर्परेट रिस्पॉन्समध्ये सीएसआरचा समावेश आहे. याच सीएसआरअंतर्गत कंपन्यांनी राज्य आणि देशाला मदत केली होती. कार्यालये, कारखाने अशा अनेक ठिकाणी आम्ही करोनाबाधितांच्या संख्येवर लक्ष ठेऊन आहोत. एखादा करोना पॉझिटिव्ह आढळला तर त्याला आयसोलेट करुन इतरांना क्वारंटाइन करुन कार्यालयाचं काम सुरु राहील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सिव्हिक रिस्पॉन्समध्ये आम्ही लॉकडाउन आणि अनलॉकवर लक्ष केंद्रीत करणार आहोत, असं आदित्य म्हणाले.

नक्की वाचा >> मोदी-ठाकरे भेट : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांकडे साकडं

लसीकरणावर भर…

ग्रामीण भागांमध्ये लसीकरणासंदर्भात असलेल्या भीतीसंदर्भात बोलताना आदित्य यांनी आमचे अधिकारी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करुन घ्यावे यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, असं आदित्य यांनी स्पष्ट केलं.

नक्की वाचा >> त्यासाठी आम्ही पंतप्रधानांचे आभार मानतो, आता अडथळे येणार नाहीत अशी अपेक्षा : उद्धव ठाकरे

लोकल ट्रेन कधी सुरु करणार?

लोकल ट्रेन सुरु करण्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आदित्य यांनी आमच्या मेडिकल टास्क फोर्सला जेव्हा वाटेल की हा ट्रेन सुरु करण्याचा योग्य वेळ आहे त्यावेळी ही सेवा सुरु केली जाईल. जास्तीत जास्त जणांचे प्रमाण वाचवण्याला आमचं प्राधान्य असल्याचं आदित्य यांनी सांगितलं आहे.