News Flash

महाराष्ट्राच्या मदतीला धावले मुकेश अंबानी; गुजरातच्या फॅक्टरीतून १०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा

मुकेश अंबानी यांनी यासाठी कोणतंही शुल्क आकारलेलं नाही

संग्रहित (Twitter)

महाराष्ट्रात करोनाची स्थिती हाताबाहेर जात असल्याने राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा केली आहे. करोना संसर्गाची साखळी तोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासोबतच राज्य सरकारसमोर अनेक मोठी आव्हानं आहेत. राज्यात रेमडेसिवीरचा तसंच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकारने यासाठी केंद्राकडे मदतही मागितली आहे. दरम्यान राज्याच्या मदतीसाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पुढाकार घेतला आहे.

जगातील सर्वात मोठी रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेकडून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. गुजरातमधील जामनगर येथून महाराष्ट्राला हा ऑक्सिजन पुरवठा केला जाणार असून यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं कंपनीच्या एका कर्मचाऱ्यानं सांगितलं असल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. कंपनीच्या नियमांमुळे त्यांनी आपलं नाव जाहीर केलेलं नाही.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील ट्विट करत या माहितीला दुजोरा दिला आहे. “रिलायन्सच्या जामनगर प्लँटमधून महाराष्ट्रासाठी १०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. विभागीय आयुक्त, रायगड व ठाणे जिल्हाधिकारी आणि एफडीए आयुक्त यांची समन्वय समिती ऑक्सिजन पुरवठ्याबाबत समन्वयाचे काम करेल,” अशी माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली आहे.

हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्यासाठी केंद्राने मदत करावी – उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा करताना बेड्स, व्हेंटिलेटर्ससह ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारकडे महत्वाची मागणी केल. हवाई मार्गाने ऑक्सिजन अन्य राज्यांमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली होती.

या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “राज्यात दररोज साधारणपणे १२०० मेट्रीक टन ऑक्सिजनचं उत्पादन होतं. आजच्या घडीला आपण १०० टक्के ऑक्सिजनचा वापर हा पूर्णपणे आरोग्य सुविधांसाठी म्हणजे ज्या करोनाबाधितांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी हा प्राणवायू वापरतो. साधारणपणे आज आपण दररोज ९५० ते १००० टन एवढा ऑक्सिजन वापरतो आहोत. बेड्स मिळत नाहीत, ऑक्सिजन अपुरा पडत आहे. रेमडेसिवीरची प्रचंड मागणी वाढलेली आहे. आपण औषध पुरवठा कमी पडू देणार नाही, जिथून मिळतील तिथून औषध घेत आहोत.”

“मी पंतप्रधान मोदींना विनंती केली की, आम्हाला येत्या काही काळात ऑक्सिजनची आवश्यकता भासणार आहे. राज्यातील कारखाने, उद्योगांना देखील ऑक्सिजनबात विनंती करण्यात आली असून, त्यांनीदेखील क्षमेतप्रमाणे ऑक्सिजन द्यायला सुरूवात केली आहे. मात्र तरीदेखील अधिकचा जो ऑक्सिजन लागणार आहे, तो आम्हाला अन्य राज्यांमधून आणण्यासाठी परवानगी द्या आणि ती वाहतूक सोयीस्कर होईल याच्यासाठी देखील मदत करा. इतर राज्यांमध्ये देखील जे ऑक्सिजन उत्पादक आहे, त्यांच्याकडून आपल्याकडे रस्ते मार्गाने ऑक्सिजन यायला किती वेळ लागणार? आणि किती येणार? आपल्याला सुरळीत पुरवठा हवा आहे. यासाठी मी पंतप्रधानांना विनंती करतो आहे, त्यातील एक म्हणजे रस्ते मार्गाने ऑक्सिजन आणेपर्यंत आमच्याकडे फार विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला कल्पना नाही असं करता येणं शक्य आहे का? असेल तर आपल्याला लष्करी तज्ज्ञांची मदत घेऊन, जर हवाई वाहतूकीने आपण ऑक्सिजन आणू शकलो आणि आणू शकत असू तर कृपा करून आम्हाला केवळ परवानगी नाही तर हवाई दलाला सांगून आम्हाला मदत करायचे तसे आदेश द्या. आता एवढी निकड आपल्याला ऑक्सिजनची आहे. या मागणीसाठी मी पंतप्रधानांना फोन देखील करणार आहे व पत्र देखील लिहणार आहे.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 12:15 pm

Web Title: coronavirus mukesh ambani reliance industries ltd sends oxygen from gujarat refineries for maharashtra sgy 87
Next Stories
1 पहाटेच्या सरकारच्या ऑपरेशनचे अजित पवार सर्जन -संजय राऊत
2 माझी मागणी मान्य केल्याबद्दल नरेंद्र मोदींचे आभार – राज ठाकरे
3 “बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचं हित माहितीये, आम्ही…”; पंकजा मुंडेंचा धनंजय मुडेंवर निशाणा
Just Now!
X