02 March 2021

News Flash

तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती – शरद पवार

“केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचं योग्य पालन केलं पाहिजे”

शरद पवारांनी त्यांच्या टि्वटर हँडलवरुन खबरदारी घेण्याचा हा सल्ला दिला आहे.

दिल्लीमधील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची अजिबात गरज नव्हती असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी वारंवार टीव्हीवर यासंबंधी बातम्या दाखवून सांप्रदायिक कलह वाढेल अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे असंही म्हटलं आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचं योग्य पालन करा असं आवाहन केलं.

शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं की, “सध्याच्या घडीला देशात ४०६७ करोनाच्या केसेस आहेत. तसंच ११८ मृत्यू झाले आहेत. ३२८ रुग्ण बरे होऊन घऱी गेले आहेत. हे प्रमाण दुर्लक्ष करण्यासारखं नाही. करोनाचा रुग्ण बरा होऊ शकतो ही स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे सूचनांचं पालन केलं पाहिजे. ही आजची गरज आहे”.

“या सगळ्या स्थितीत एकत्र राहण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत कटुता, संशय वाढेल अशी स्थिती निर्माण होऊ न देण्याची गरज आहे. मी टीव्हीवर जे काही पाहतो व्हॉट्सअपवर येणारे मेसेज चिंता निर्माण करणारे आहेत. काही मेसेजची तपासण केल्यानंतर लक्षात आलं की, पाच पैकी चार मेसेज खोटे असतात. हे खोटे मेसेज लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. आणि वास्तव पुढं आलं तर वारंवार त्याची मांडणी करुन त्याबद्दल एक प्रकारचा गैरसमज निर्माण केला जात आहे. हे कुणी मुद्दामून करत आहे का याबद्दल शंका वाटते,” असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.

तबलिगी जमातच्या कार्यक्रमावर बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, “खरं तर अशा परिस्थितीत कार्यक्रम घेण्याची गरज नव्हती. त्यांना परवानगी देण्याची गरज नव्हती. महाराष्ट्रात कार्यक्रम घेण्यासाठी विनंती करण्यात आली होती. पण आपल्याकडे ती परवानगी नाकारण्यात आली. दिल्लीतही महाराष्ट्राप्रमाणे परवानगी नाकारली असती तर टीव्हीवरुन वारंवार एखाद्या वर्गाला, समाजाच्या संबंधी एक चित्र मांडून सांप्रदायिक कलह वाढेल की काय अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे, ती संधी मिळाली नसती”.

“सोलापुरात एका गावी बैलगाडा शर्यत पार पडली. असा सोहळा करायची गरज नव्हती. पण आनंद आहे की पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तो प्रकार तिथेच थांबला. तशी तत्परता दिल्लीत दाखवली असती तर आज जे पहायला मिळातंय ते पुन्हा पुन्हा पहायला मिळालं नसतं. दिल्लीत जे काही घडलं ते रोज टीव्हीवर दाखवण्याची गरज आहे का ? त्यातून आपण काय परिस्थिती निर्माण करु पाहत आहोत. याचा विचार करण्याची वेळ आहे. जाणकार लोक याबद्दल खबरदारी घेतील,” असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

आज १३ वा दिवस असून दिवस कमी होत आहेत. काळजी घेतली तर निश्चित यश मिळेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना शरद पवारांनी सांगितलं की, “हे संपल्यावर देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि समाजाच्या आरोग्यावर होणाऱ्या विपरित परिणामावर विचार केला पाहिजे. जाणकारांनी अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असं सांगितल आहे. आरबीआयचे माजी गव्हर्नर यांनी सगळ्यात मोठं संकट रोजगारासंबंधी असेल असा इशारा दिला आहे. रोजगार निर्मितीला तोंडं कसं द्यायचं याचा विचार तज्ञांनी केला पाहिजे. मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांना काही जाणकार लोकांना एकत्र बोलवूया त्यांचा सल्ला घेऊया अशी विनंती केली आहे. त्यांच्याशी बोलून जे काही आर्थिक संकट निर्माण होईल त्यावर चर्चा केली पाहिजे असं मी त्यांनी सांगितलं. त्यांनी ती मान्य केली आहे”.

“आर्थिक संकटासोबत सामना करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना आर्थिक पॅकेज देण्याची गरज आहे. तसंच शेतीला बळ देत मार्गदर्शन केलं पाहिजे. रब्बी हंगाम संपत आला आहे. गहू, तांदूळचं पीक घेण्याची वेळ आली आहे. वेळेवर काढली नाही तर शेती अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल,” असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर येऊ नये अशी विनंती शरद पवार यांनी मुस्लिमांना यावेळी केली. “११ तारखेला महात्मा फुले यांची जयंती आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला ज्ञानाचा, एकतेचा संदेश दिला. त्यावेळी ज्ञानाचा दिवा लावून एक दिवा ज्ञानाचा या प्रकारचा संदेश देण्यासाठी योग्य दिवस आहे. १४ तारखेला बाबासाहेबांची जयंती आहे. महिनाभर आपण ती साजरी करतो. आपण एक दिवा संविधानाचा लावून जयंती साजरी करुया. उत्सवाचं स्वरुप येणार नाही याची खबरदारी घेऊयात, गर्दी टाळूया. अंतर राहील याची काळजी घेऊया आणि सर्व परिस्थितीवर मात करुयात,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही अंधश्रद्धेला समर्थन दिलं नाही. कधीही अंधश्रद्धेच्या मागे जाऊ नका. माणसानं चिकित्सक असं पाहिजे. अंधश्रद्धेचं समर्थन करु नका असंही यावेळी शरद पवारांनी सांगितलं. संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेल्या सूचना पाळूया आणि यशस्वीपणे जिंकत इतिहास घडवूयात असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 11:31 am

Web Title: coronavirus ncp sharad pawar delhi nizamuddin tablighi jaamt sgy 87
Next Stories
1 “प्राण्यांनाही दिवे पोहोचविले होते का?; जंगल, दऱ्या खोऱ्यात, पर्वत रांगांमध्येही दिवे लागले”
2 मुंबईतून कोकणात जाण्यासाठी जिवंत काकीला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलं पण…
3 करोना संरक्षित सूट व पोषक आहार द्या – परिचारिकांची मागणी
Just Now!
X