प्रदीप नणंदकर, लोकसत्ता

लातूर : संपूर्ण जग करोनामुळे विविध प्रकारे अडचणीत आले आहे. त्यात आर्थिक अडचणही मोठी निर्माण झाली आहे. लातुरातील घरबांधणी प्रकल्प कधी पाणी, कधी रेरा, कधी वस्तू व सेवाकर, कधी निश्चलनीकरण अशा कारणांमुळे अडचणीत आला असून आताची करोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यासारखी समस्या मात्र अतिशय मोठी असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

केड्राई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी साधलेल्या संवादानुसार लातूरमध्ये संघटनेकडे ४५ सभासद नोंदणीकृत असून नोंदणी नसलेले तेवढय़ाच संख्येने आहेत. व्यवसायाच्या अनुषंगाने कुशल व अकुशल कामगारांची संख्या जवळपास ७ हजार असून यात पश्चिम बंगाल, बिहार, राजस्थान या प्रांतातील सुमारे ९० टक्के लाके आपआपल्या प्रांतात परतले आहेत. २१ मार्चपासून घरबांधणी प्रकल्प पूर्णपणे बंद आहेत. कुशल कामगार २ हजार, तर अकुशल कामगारांची संख्या ५ हजार एवढी आहे. ही सर्व मंडळी रोजच्या कमाईवर आपल्या कुटुंबांचे गुजराण करत होती. कुशल कामगारांकडे थोडीबहुत पुंजी शिल्लक असेल तर मात्र अकुशल कामगारांकडे रोजच्या कमाईचे पैसे दैनंदिन खर्चालाच संपत असल्याने त्यांच्याकडे पारशी गंगाजळी शिल्लक नसते.

करोनाच्या संकटाचे सावट आणखीन किती दिवस सहन करावे लागणार आहे, याचा अंदाज नाही. त्यामुळे बंद पडलेली कामे नेमकी कधी सुरू होतील हे सांगणेही अवघड झाले आहे. परप्रांतीय कामगारांत कुशल कामगारांची संख्या अधिक आहे. ही मंडळी नक्की परतणार की नाही हे सांगणेही अवघड आहे. त्यामुळे एकूण कामाची गती मंदावणार हे नक्की. या व्यवसायात १ हजार कोटींपेक्षा अधिकची गुंतवणूक लातुरात आहे. त्यातील किमान ५० टक्के गुंतवणूक बंँकांकडून कर्ज काढून केलेली आहे. बँकेचे व्याज चालू राहणार व प्रकल्प पूर्ण वेळेत होत नसल्याने व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागणार. करोनाच्या समस्येमुळे सगळेजण आर्थिक संकटात असल्याने काम पूर्ण करूनही पैसे हातात मिळतील याची खात्री देता येत नाही. अनेकांना दिवाळखोरी जाहीर करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे, असे काही व्यावसायिकांनी सांगितले.

व्यवसायाचे कंबरडे मोडले

बिल्डर्स व डेव्हलपर्स असोसिएशनचे तथा क्रेडाईचे लातूरचे अध्यक्ष धर्मवीर भारती यांनी या व्यवसायात आमचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. प्लॉट खरेदी करून विकणारे अथवा प्लॉटवर रो-हाऊस, बंगलो, घर, बांधून विकणारे बिल्डर्स आता पूर्णपणे आर्थिक कोंडीत सापडलेले आहेत. यातून बाहेर पडणे अवघड झाले असल्याचे भारती यांनी सांगितले.