करोनाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ चिंताजनक असून विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारला मदत करण्यासाठी अनेक सेलिब्रेटी तसंच सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये अनेक मोठ्या उद्योजकांचाही समावेश आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने रिलायन्स इंडस्ट्रीजने मदतीसाठी पुढाकार घेत मुंबईत विशेष रुग्णालय सुरू केलं आहे. अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र १०० बेड्सची सुविधा करण्यात आली आहे.

करोनाच्या पार्श्वभुमीवर देशात प्रथमच हे पाऊल उचललं गेलं आहे. अवघ्या दोन आठवडय़ांत याबाबतची सुसज्जता समूहाने केली आहे. समूहाच्या रिलायन्स फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेद्वारे ही मदत करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील लोधिवली येथील रुग्णालयात विलगीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर रिलायन्स लाइफ सायन्सेसमध्ये चाचणी सुविधा आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ कोटी
करोनाशी लढा देण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून आर्थिक मदत देण्यात आली असून मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्सने महाराष्टाच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच कोटी रुपयांची देणगी दिली आहे. रिलायन्स फाऊंडेशनमार्फत विविध शहरांमध्ये गरजूंना मोफत जेवण पुरवले जाणार आहे. तसंच करोना रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व आपत्कालीन सेवा वाहनांसाठी मोफत इंधन उपलब्ध करून दिले जाणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने दिवसाला एक लाख मास्क तयार करण्यापर्यंतची क्षमता वाढविली आहे. समूहाच्या विविध कंपन्या, विभागात कार्यरत असलेले कंत्राटी तसेच तात्पुरते कर्मचाऱ्यांना नियमित वेतन दिले जाईल, असे रिलायन्सने स्पष्ट केले आहे.