सध्या जगभरासह भारतात थैमान घालणाऱ्या करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यातील अनेक मंदिरे काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर आता लाखो वारकऱ्यांचे व अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले पंढरपुरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देखील आता बंद ठेवले जाणार आहे. १७ ते ३१ मार्च या कालावधील देवाचे पदस्पर्श व मुख दर्शन बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

असे जरी देवाची नित्य पुजा सुरुच राहणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. दरम्यान,आजपर्यंतच्या इतिहासात मंदिर बंद ठेवले जाण्याची पहिलीच वेळ आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अनेक मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय झाला. या पार्श्वभूमीवर पंढरपुर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे मंदिर देखील बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. पंढरपुरात विठूरायाच्या दर्शनासाठी राज्यासह इतर राज्यातील शेकडो भाविक कायम येत असतात. हे पाहता करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने खबरदारीचे उपाय योजले आहेत. ४ एप्रिल रोजी चैत्र वारी आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने काही निर्णय घेतल्याचेही सांगितले जात आहे.

देवाची आज (१७ मार्च) संध्याकाळी धुपारती झाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. राज्यात दिवसेंदिवस करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाल्याचेही दिसून आले आहे. याचा फटका पंढरपुरातील अर्थकारणावर बसण्याची चिंता स्थानिक व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली आहे.

दरम्यान, शेकडो वर्षांची परंपरा असलेले हे देवस्थान आहे. प्लेग, महापूर या सारखी अनेक संकटे आल्यावरही मंदिर बंद ठेवण्यात आले नव्हते. हे पाहता श्री विठ्ठल मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच दर्शनासाठी मंदिर बंद ठेवावे लागत असल्याचे इतिहासा अभ्यासक अॅड. धनंजय रानडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे विठूरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आता मंदिराच्या कळसाचे दर्शन करूनच काही दिवस तरी समाधान मानावे लागणार आहे.