सोमवारपर्यंत लसीकरण केंद्रे बंद राहणार?

पालघर : करोना प्रतिबंध लसींचा साठा मिळत नसल्याने जिल्ह्याातील लसीकरण मोहिमेला शनिवारपासून पुन्हा एकदा खंड पडणार आहे. जिल्ह्याातील बहुतांश केंद्रावर शुक्रवारच्या दिवसापर्यंत पुरेल इतकाच लससाठा उपलब्ध असल्यामुळे किमान सोमवारपर्यंत लसीकरण सुरू होणार नाही अशी पालघर जिल्ह्यातील स्थिती आहे.

वसई-विरार महानगरपालिकेसह पालघर जिल्ह्यात ६९ शासकीय केंद्रांमध्ये व १७ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाचे काम सुरू असते. दररोज जिल्ह्यात साडेपाच ते सहा हजार नागरिकांचे लसीकरण केले जात असून गुरुवारी सायंकाळी ४५१० लसींचा साठा शिल्लक होता. परिणामी जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर लसीचा साठा उपलब्ध नसल्याने शुक्रवारी लसीकरण बंद ठेवले होते. पालघर जिल्ह्या करिता लागणारा लसींचा साठा ठाणे येथून येत असून सहा हजार लसींच्या गरजेसमोर दररोज जेमतेम चार ते साडे चार हजार लसी उपलब्ध आहेत होत आहेत. परिणामी त्याचा फटका लसीकरणावर झाला असून काही केंद्रे दोन सत्रांऐवजी एका सत्रामध्ये लसीकरण मोहीम सुरू ठेवत आहेत.  जिल्ह्यात उपलब्ध असणारा लसींचा साठा शुक्रवारी संपुष्टात येण्याची शक्यता असून विक्रमगड तालुक्यातील काही केंद्रे वगळून अधिकतर ठिकणी लसीकरण बंद राहील अशी स्थिती आहे. नवीन लससाठा घेण्यासाठी ठाणे येथून अजूनही निरोप प्राप्त न झाल्याने जिल्ह्यातील लसीकरण पुढील दोन दिवस बंद राहणार आहे. अनेक केंद्रांनी लसीकरण बंद राहण्याबाबतचे फलक लावले असून लसीकरणासाठी दूर अंतरावरून येणारी मंडळी निराश होऊन परतताना दिसून येत आहेत.