News Flash

Coronavirus : अलिबागमध्ये सुरू आहे व्हिडिओद्वारे दूरस्थ योगवर्ग

आरोग्याबद्दल जागरूक नागरिकांचा मिळत आहे प्रतिसाद

करोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी अवलंबिण्यात आलेली संचारबंदी आणि सामाजिक विलगीकरणाच्या पार्श्वभूमीवर ठप्प झालेला दैनंदिन जीवनक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुसह्य करण्याचे प्रयत्न विविध स्तरावर सुरू आहेत. असाच एक ऑनलाइन दूरस्थ योग प्रशिक्षण वर्गाचा अभिनव प्रयोग अलिबाग येथील सुंदर वेलनेस सेंटरतर्फे त्यांच्या साधकांसाठी  सध्या राबविण्यात येत आहे, ज्याचे योगप्रेमींकडून उत्स्फूर्त स्वागत होत आहे.

गतवर्षीच्या मार्च महिन्यात योगप्रशिक्षिका सायली वेंगुर्लेकर यांनी अलिबागमध्ये वेलनेस योग सेंटरची स्थापना केली. या योग सेंटरमध्ये अलिबाग परिसरातील जवळजवळ ८० साधक नित्यनेमाने दिवसभरातील वेगवेगळ्या वेळात योगसाधना करत असतात.  मात्र गेले काही दिवस कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर संचारबंदी जाहीर झाल्यामुळे शासकीय आवाहनाला प्रतिसाद देत योगवर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

योगवर्ग बंद झाल्यावर प्रशिक्षिकेने नेमून दिलेली योगासने आणि क्रिया साधक आपापल्या घरी करीत होते. तरीही सर्वांनी एकत्र योगा करण्यामुळे अनुभवायला येणार्‍या ऊर्जेचा अभाव साधकांना जाणवत असलेल्याचे मत त्यांनी प्रशिक्षेकेकडे नोंदविले. यातून मोबाइलमधील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅपद्वारे योगवर्ग घेण्याची कल्पना पुढे आली आणि त्यानुसार सोमवार ३० मार्चपासून जवळपास 50 योग साधक या ऑनलाइन दूरस्थ योग प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेत आहेत.

या उपक्रमा अंतर्गत साधकांना ऑनलाइन वर्गाची वेळ कळविण्यात येते व ठरल्या वेळेनुसार सर्व साधक मोबाइलमधील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅपद्वारे प्रशिक्षकाशी जोडले जातात. योगप्रशिक्षिका सायली आणि त्यांचे पती कल्पेश हे त्यांच्या नागाव येथील राहत्या घरातून योग प्रशिक्षणाबाबत सूचना देतात आणि अलिबागमधील वेगवेगळ्या ठिकाणचे सुमारे ५० साधक आपापल्या घरी त्यानुसार योग क्रिया व आसने करत असतात.

इच्छाशक्ती असेल तर आलेल्या संकटावर मात करता येते याचा वस्तूपाठ या ऑनलाइन योगवर्गाने घालून दिला असल्याचे मत योग साधक भारती वझे यांनी व्यक्त केले. तर सध्याच्या सोशल डिस्टन्सिंगच्या काळात या अभिनव कल्पनेद्वारे सर्वजण एकमेकांच्या संपर्कात राहून सामूहिकरित्या योग करण्याचा आनंद मिळवता येतो अशी प्रतिक्रिया अॅड. स्वाती लेले यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 5:47 pm

Web Title: coronavirus yoga class beginning in alibaug by video msr 87
Next Stories
1 लॉकडाउन : परिस्थितीचा फायदा घेणारी लोकं म्हणजे मयताच्या टाळूवरचं लोणी खाणारे; अजित पवारांचा संताप
2 करोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही धोक्याची घंटा- अजित पवार
3 Lockdown: अत्यावश्यक सेवेसाठीच्या पासचा गैरवापर; जप्तीचे पोलिसांना आदेश
Just Now!
X