राज्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असताना यवतमाळमधून दिलासा देणारी बातमी आली आहे. यवतमाळ जिल्हा करोनामुक्त झाला आहे. येथील स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या तीन करोनाबाधित रुग्णांचे अखेरचे तपासणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे या तिघांनाही आता विलगीकरण कक्षातून आज शनिवारी सुट्टी देण्यात आली आहे. यासोबतच यवतमाळ रुग्णांची संख्या शुन्यावर आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली आहे. सुट्टी देण्यात आलेल्या तिघांनाही पुढील १४ दिवस आरोग्य विभागाच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली.

दुबईवरून जिल्ह्यात आलेल्या नऊ जणांना लक्षणे असल्यामुळे १२ मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या सर्वांच्या घशाच्या द्रवाचे नमुने तपासणीकरीता नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. यापैकी तीन जणांचे नमुने पॉझिटिव्ह तर उर्वरीत सहा जणांचे नमुने निगेटिव्ह आले होते. त्यामुळे इतरांना सुट्टी देण्यात आली होती. तर पॉझिटिव्ह नमुने असलेले हे तीन जण तेव्हापासूनच विलगीकरण कक्षात दाखल होते. त्यांच्या प्रकृतीबाबत जिल्हा प्रशासन व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन अतिशय दक्ष होते.

शासनाच्या निर्देशानुसार या तिघांचे उर्वरीत दोन नमुने १४ दिवसानंतर तपासणीसाठी पुन्हा पाठवण्याच्या सूचना महाविद्यालय प्रशासनास देण्यात आल्या. त्यानुसार तिन्ही नागरिकांचे नमुने २६ मार्च रोजी नागपूरला पाठवण्यात आले. त्याचा रिपोर्ट २७ मार्चला प्राप्त झाला. हा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे उर्वरीत शेवटचे नमुने २७ मार्चला पुन्हा नागपूरला पाठवले. तिन्ही नागरिकांचा हा शेवटचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून तो २८ मार्च रोजी प्राप्त झाला.

१४ दिवसांच्या अथक उपचारानंतर पाठवण्यात आलेले उर्वरीत दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे या तिन्ही नागरिकांना विलगीकरण कक्षातून शनिवारी सुट्टी देण्यात आली आहे. मात्र त्यांना गृह विलगीकरणात पुढील १४ दिवस ठेवण्यात येणार असून आरोग्य विभागाचे पथक त्यांची नियमित  तपासणी करणार आहे. शुक्रवारी रात्री एका नागरिकाला विलगीकरण कक्षात दाखल केल्यामुळे सद्यस्थितीत विलगीकरण कक्षात केवळ एक नागरिक आहे. तर जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांची संख्या ८९ झाली आहे.

नागरिकांनी कलम १४४ चे सक्तीने पालन करावे – जिल्हाधिकारी एम.डी.सिंह
जिल्ह्यातील तीन पॉझिटिव्ह नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आल्यामुळे आता जिल्ह्यात पॉझेटिव्ह संख्या शुन्यावर आली आहे, ही जिल्ह्यासाठी अतिशय आनंददायी बातमी आहे.  यासाठी सर्व आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांची जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी प्रशंसा केली आहे. तसेच जिल्ह्यात संचारबंदी सुरू असून कलम १४४ ची अमलबजावणी करण्यात येत आहे. नागरिकांनी देखील या नियमाचे सक्तीने पालन करावे. जिल्हा प्रशासन आणखी सक्तीने या संचारबंदीची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये. अत्यावश्यकता असेल तेव्हाच तेही कोणत्याही एका जागेवर गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. एकमेकांपासून किमान तीन मीटर अंतर राखावे, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.