कापूस उत्पादक क्षेत्रात किडीचा प्रादुर्भाव  

प्रबोध देशपांडे, लोकसत्ता

अकोला : विदर्भ, मराठवाडय़ातील कापूस उत्पादक क्षेत्राला पुन्हा एकदा गुलाबी बोंडअळीचा फटका बसला आहे. कापूस क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर किडीचा प्रादुर्भाव झाला असून बोंडअळीमुळे या वर्षी कापूस उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. सिंचनाची सुविधा असलेल्या भागात बाधित कपाशी उपटून रब्बी हंगामील पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. गुलाबी बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, राज्य शासनाने मदत करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

खरीप हंगामात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पिके बहरली. ढगाळ वातावरण व परतीच्या जोरदार पावसामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला. या वर्षी पुन्हा एकदा कापसाच्या बोंडाला गुलाबी अळीने ग्रासले आहे. प्रामुख्याने पश्चित विदर्भात कापसाचे उत्पादन घेतले जाते. पश्चिम विदर्भात १० लाख हेक्टरवर कपाशीचे क्षेत्र होते. गत चार वर्षांपासून कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. हंगामाच्या सुरुवातीला बोंडअळीला रोखण्यासाठी मान्सूनपूर्व पेरणी न करण्याच्या आवाहनासह जनजागृती करण्यात आली. तरीही गुलाबी बोंडअळीचा शिरकाव होऊन कपाशी पिकावर आक्रमण झाले.

मान्सूनपूर्व किंवा जूनच्या पहिल्या आठवडय़ात पेरणी केलेल्या कपाशीच्या पिकावर जुलै-ऑगस्ट महिन्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीवर दिसून आला होता. शेतकऱ्यांनी महागडी कीटकनाशके फवारूनही त्याचा उपयोग झाला नाही. एकात्मिक व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत  प्रादुर्भाव वाढत गेला. सध्या सर्वच भागांतील कापसाचे पीक बोंडअळीने बाधित झाले आहे. कापूस उत्पादन क्षेत्रात एकरी सरासरी १० ते १२ क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना त्या ठिकाणी केवळ ३ ते ४ क्विंटल उत्पादन झाले. कापसाची दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यांपर्यंत विविध टप्प्यांत वेचणी करण्यात येते. या वर्षी अळीमुळे कापसाचे बोंड व्यवस्थित उमललेच नाही. वेचणी करताना शेतमजुरांना तारेवरची कसरत करावी लागली. परिणामी, वेचणीचा खर्चही वाढला. या वर्षी एक ते दोन वेचण्याच करण्यात आल्या. आता पुढे उत्पादन येण्याची शक्यता नाही. बोंडअळीमुळे सर्वच बोंडे सडून गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता पीक मोडून अथवा उखडून टाकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. बाधित पीक उमटून बांधावर जाळून टाकण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी रब्बी हंगामावर लक्ष केंद्रित करीत आहेत. हरभरा, गहू, कांदा पेरण्याकडे त्यांचा कल दिसून येतो.

विदर्भात ९० टक्के कोरडवाहू शेतकरी आहेत. त्यामुळे त्यांना गुलाबी बोंडअळीमुळे मोठय़ा आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. कापूस विक्रीसाठी बाजारपेठेत आल्यावर सुरुवातीच्या काळात कमी दर मिळाला. या वर्षी उत्पादनच कमी असल्याने थोडय़ा फार फरकात हमीभावात कापसाची खरेदी होत आहे. मात्र, उत्पादनच घटल्याने बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसला असून शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

सोयाबीनचेही नुकसान

पश्चिम विदर्भात सर्वाधिक १४ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. पेरणीनंतर आवश्यक असताना पाऊस पडला नाही. त्यानंतर परतीच्या अतिपावसामुळे सोयाबीनवर विपरीत परिणाम झाला. अनेक ठिकाणी सोयाबीनला मोठय़ा प्रमाणात कोंब फुटले. सोबतच किडींचा प्रादुर्भाव झाला. दाणे बारीक झाले व ते काळे पडले. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये ५० ते ६० टक्के घट झाल्याचे कृषितज्ज्ञ सांगतात. उत्पादनच कमी झाल्याने सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे. शेतकऱ्यांकडे मर्यादित उत्पादन असल्याने त्याचा लाभ होत नसल्याचे चित्र दिसून येते.

विदर्भ, मराठवाडय़ातील नुकसानीकडे दुर्लक्ष

गुलाबी बोंडअळीमुळे विदर्भ व मराठवाडय़ातील कापूस उत्पादक क्षेत्रात शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. अनेक भागात नुकसानीची पातळी ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली. तरीही राज्य शासनाने या नुकसानीची दखल घेतलेली नाही. अद्याप पंचनामेही करण्यात आलेले नाही.

विदर्भ व मराठवाडय़ातील नुकसानीकडे सत्ताधारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे.

विदर्भातील तुरीवरही अळय़ांचे संकट

विदर्भातील जिल्हय़ांमध्ये विविध भागांत तुरीच्या पिकांवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे संकट निर्माण झाले. सध्या तूर पीक फुलोरा अवस्थेत आहे. त्यावर शेंगा पोखरणाऱ्या अळय़ांची अंडी व पहिली अळी अवस्था दिसून येते. किडींच्या प्रादुर्भावासाठी पोषक वातावरण असल्याने इतर पिकांबरोबर तुरीलाही मोठा फटका बसण्याचा धोका व्यक्त होत आहे.

तीन महिन्यांत प्रादुर्भाव वाढला

मान्सूनपूर्व किंवा जूनच्या पहिल्या आठवडय़ात पेरणी केलेल्या कपाशीच्या पिकावर जुलै-ऑगस्ट महिन्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीवर दिसून आला होता. शेतकऱ्यांनी महागडी कीटकनाशके फवारूनही त्याचा उपयोग झाला नाही. एकात्मिक व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत  प्रादुर्भाव वाढत गेला.

गुलाबी बोंडअळीमुळे ६० ते ७० टक्के पिकाला फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून मदत देण्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत आहे. शासनाने २ हजार बोनस किंवा एकरी २० हजार मदत द्यावी. 

– आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष, भाजप

कापूस पिकांवर दरवर्षी बोंडअळीचे संकट येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. या वर्षीही सुमारे ८० टक्के प्रादुर्भाव आहे. उत्पादनात मोठी घट झाली. शासनाने त्वरित दखल घेऊन मदतीची घोषणा करावी.

– डॉ. प्रकाश मानकर, महाराष्ट्र कृषक समाज