मुलांच्या खेळण्यात नेहमी खोटय़ा नोटा पाहण्यात येतात. बच्चो की बँक म्हणून अशा बनावट नोटांवर उल्लेख असतो. परंतु याच बच्चो की बँकने एकास एक लाख रुपयास गंडविले. हजार व पाचशेच्या एक लाख रुपये नोटा आणून द्या आणि शंभराच्या तीन लाख रुपयांच्या नोटा घेऊन जा, असे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यास अटक करण्यात आली.
नारायण गणपत आगलावे (आडगाव, तालुका पूर्णा) असे फसवणूक झालेल्याचे नाव आहे. आगलावे यांनी कोतवाली पोलिसात तक्रार दिली. दीड महिन्यांपूर्वी आगलावे रेल्वेने पूर्णेला जात होते. त्यांच्याजवळ सय्यद गौस सय्यद मकदुम हा बसला होता. प्रवासात दोघांची ओळख झाली. आपल्या मालकाजवळ गोदाम भरून शंभर रुपयांच्या नोटा आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत पशांचा साठा ठेवणे धोकादायक असल्याने या नोटा लपविल्या आहेत. आता जो कोणी पाचशे किंवा हजाराच्या नोटा आणून देईल, त्याला तीनपट शंभर रुपयांच्या स्वरुपात रक्कम दिली जाणार आहे, असे गौस याने आगलावे याला सांगितले. ही माहिती खरी वाटावी म्हणून त्याने दोन वेळा शंभर रुपयांच्या नोटा आगलावे यांना खर्च करण्यासाठी दिल्या.
गावात गेल्यानंतर या नोटा खऱ्या असल्याची खात्री होताच आगलावे यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार अशा नोटांचे एक लाख रुपयांचे बंडल परभणी बसस्थानकाजवळील हॉटेलमध्ये गौस यास दिले. गौस याने शंभर रुपयांच्या नोटांची तीस बंडले बंद करून आगलावेच्या ताब्यात दिली. आगलावे यांची खात्री व्हावी, या साठी वरच्या भागावर शंभर रुपयांची नोट लावली होती आणि पोलीस छापा टाकतील, अशी भीती दाखवून गौस तेथून घाईने निघून गेला. आगलावे यांनी काही वेळानंतर बंडल फोडले असता त्यात केवळ एकच शंभराची नोट खरी निघाली, तर बाकीच्या नोटा ‘बच्चो का बँक’ नावाने असल्याचे दिसून आले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आगलावे यांनी गौसला दूरध्वनी केला. त्यावर ‘हा माझा व्यवसाय आहे. तू आणखी एखादा ३ लाख रुपये खऱ्या नोटा देणारा व्यक्ती तयार कर. मी त्यातील एक लाख तुला देतो व पहिल्यासारखेच ३ लाख रुपये देणाऱ्यास ९ लाख रुपये देईल,’ असे सांगितले. आगलावे यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांना ही माहिती दिली. त्यानुसार मुगळीकर यांच्या पथकाने सापळा रचला.
आगलावे यांनी गौसला दूरध्वनी करून ३ लाख रुपये देणारा माणूस तयार आहे. तू परभणीच्या बसस्थानकात ये, असे सांगताच गौस येण्यास तयार झाला. पोलीस कर्मचारी मधुकर पवार व अनिल इंगोले हे दोन पंचांसह तेथे दबा धरून बसले होते. नऊ लाख रुपयांच्या बनावट नोटांसह सय्यद गौस व त्याचा साथीदार शेख जुबेर शेख शहेनशाह (नांदेड) याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.