साहित्य व संस्कृती यामध्ये दोन गट नेहमीच राहिले. काश्मीरप्रश्नी केंद्राचा निर्णय योग्य असला तरी नागरिकत्व सुधारित कायद्याचे (सीएए) मात्र स्वागत करता येणार नाही. हा देश हुकूमशाहीच्या वाटेवरच असून, ९३व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे मत योग्य आहे, तर कवयित्री अरुणा ढेरे यांनी मांडलेली भूमिका अयोग्य असल्याचे मत माजी संमेलनाध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

मराठी साहित्य संमेलनाच्या आजी-माजी संमेलनाध्यक्षांच्या वैचारिक वादात डॉ. श्रीपाल सबनीय यांनी आज उडी घेतली. विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त डॉ. सबनीस यांचे गुरुवारी विवेकानंद आश्रमाच्या विचारपीठावरून व्याख्यान पार पडले. तत्पूर्वी, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक पाध्ये, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णुपंत कुलवंत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

डॉ. सबनीस म्हणाले, सीएए कायदा देशांतर्गत लोकशाहीला घातक आहे. जाती आणि धर्मावरून देशात काहींच्या हत्या होत असताना केंद्र सरकार काहीच ठोस भूमिका घेत नाही. धार्मिक उन्माद रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच म्हणत नसतील, तर या देशातील लोकशाही धोक्यात आहे अन् हा देश हुकूमशाहीच्या वाटेकडे चालला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे फादर दिब्रिटो यांनी जी काही भूमिका मांडली, ती समर्थनीय आहे. हिंसाचाराचे समर्थन करता येऊ शकत नाही, सरस्वतीच्या उपासकांना शिष्यवृत्ती द्यायला हवी, तर हे सरकार विद्यार्थ्यांना ठोकून काढत आहे, अशी टीका त्यांनी केली.

देशात कुठेच हुकूमशाही दिसत नाही, असे ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे म्हणत असतील तर त्यांची ही भूमिका समर्थनयोग्य नाही. साहित्यातील एक गट नेहमीच केंद्रातील सरकारची तळी उचलण्याचे काम करत आहे. त्या गटापैकीच त्या एक असाव्यात, असा टोलाही त्यांनी ढेरे यांना लगावला. ना.धों. महानोर यांना ब्राह्मण महासंघाने संमेलनाच्या उद्घाटनाला जाऊ  नका, अशी सूचना केली होती, त्यावर डॉ. सबनीस यांनी ब्राह्मण महासंघाचा निषेध करत सगळ्याच जातीचे महासंघ हे देशातील संविधानाचे मारेकरी असल्याचे म्हणाले.

विवेकानंद आश्रमाच्या कार्याचे कौतुक करताना ते म्हणाले, विवेकानंदांचा आध्यात्मिक विचार आणि समाजवाद येथे एकत्र नांदताना दिसते. हे सेवेचे माहेरघर असून, येथे पीडित आणि दु:खितांचे अश्रू पुसले जातात. शुकदास महाराजांच्या पश्चातही संस्थेचे कार्य अविरतपणे सुरू आहे, यातच महाराजांच्या दूरदृष्टीचा परिचय होतो.

शिवरायांच्या वंशजाचा वाद थांबवा!

खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर डॉ. सबनीस यांनी भाष्य केले. ‘शिवरायांच्या कुळाविषयी बोलणे हे पाप आहे. हा वाद तातडीने थांबवावा, अशी विनंती मी दोघांनाही करेल. शिवाजी महाराज हे कुण्या जातीचे, धर्माचे नव्हते. ते सर्वाचे होते. त्यामुळे महाराजांच्या कुळाविषयी बोलून त्यांची अवहेलना करू नये’, असे डॉ. सबनीस म्हणाले.