बुधवारचा दर ८६.१४ रुपये

कर्नाटक निवडणूक काळात रोखण्यात आलेली पेट्रोल आणि डिझेल दरवाढ अखेर झाल्याने आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर सर्वाधिक आहेत आणि त्यातल्या त्यात अमरावती शहरात देशातील सर्वाधिक दर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावतीत बुधवारी पेट्रोलचा दर ८६.१४ रुपये, तर डिझेलचा ७३.६७ रुपये इतका होता. हा दरवाढीचा उच्चांक आहे.

दररोज १२ ते १३ पैशांनी होणारी दरवाढ आता २५ ते ३० पैशांनी होत आहे. गेल्या १४ मे रोजी शहरात पेट्रोलचे दर ८३.८० रुपये, तर डिझेलचे ७१.६१ रुपये होते. आठच दिवसांमध्ये इंधनाच्या किमतीत तीन रुपयांनी वाढ झाली आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात आहे. मुंबईत पेट्रोलचा दर ८४.९९ रुपये तर डिझेल ७२.७६ रुपये आहे.

नाशिकमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी ८५.०७ रुपये, डिझेलसाठी ७१.६६ रुपये मोजावे लागत आहेत. औरंगाबादमध्ये पेट्रोल ८५.९७ रुपये, तर डिझेल ७३.७५ रुपये आहे. विभागीय मुख्यालय असलेल्या अमरावतीत मात्र, दरवाढीचा सर्वाधिक फटका बसत आहे.

पेट्रोल पंप संचालकांच्या मते केंद्र सरकार पेट्रोलवर १९.४८ रुपये तर डिझेलवर १५.३३ रुपये उत्पादन कर लावते. हा कर कमी केला जाऊ शकतो. प्रत्येक राज्य वेगवेगळा व्हॅट आकारतात. महाराष्ट्रात ४६.५२ टक्के व्हॅट आहे. तो कमी करावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली होती, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

बांधकाम खात्याचा कर पडतोय भारी

देशात पेट्रोल-डिझेलचे सर्वाधिक दर अमरावतीत का, हा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. अमरावती शहराला ज्या डेपोतून इंधनाचा पुरवठा केला जातो, त्याचे अंतर अमरावतीपासून २५० किलोमीटर आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढतो आणि इंधनाच्या किमती इतर शहरांच्या तुलनेत जास्त असतात. महापालिका क्षेत्रात पेट्रोल-डिझेलवर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कर आकारला जातो. हा कर देखील अमरावतीला लागू आहे. त्यामुळे अमरावती शहर आणि ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीसा फरक आहे.

डेली प्राईस चेंजला विरोध कायमच

पेट्रोल-डिझेलचे सर्वाधिक दर अमरावतीत आहेत, त्याला कारण वाहतुकीचा वाढलेला खर्च आहे. त्यामुळे अमरावतीनजीक डेपोची व्यवस्था करण्यात यावी, हा एक उपाय आहे. सातत्याने इंधनाचे दर वाढतच आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. पेट्रोल पंपचालकांनी ‘डेली प्राईस चेंज’ ला विरोध दर्शवला होता, तरीही ती प्रणाली लागू करण्यात आली. सरकारने इंधनाचे दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा मिळवून दिला पाहिजे.

सौरभ जगताप, सचिव, अमरावती पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन.

सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ज्या प्रदेशात होतात, सिंचनाचा सर्वाधिक अनुशेष ज्या विभागात आहे, त्या विभागीय मुख्यालयात इंधनाचे सर्वाधिक दर असावेत, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. ही दरवाढ अयोग्य आहे. शहरातील लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळवून दिला पाहिजे.

दिनेश बूब, नगरसेवक, अमरावती