घरच्या लोकांचा लग्नाला विरोध असल्याने प्रेमीयुगुलाने गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना वैजापूर तालुक्यातील खंबाळा शिवारात घडली. गळफास घेवून आत्महत्या करणारे प्रेमीयुगुल हे वैजापूर तालुक्यातील जांबरगावचे रहिवासी असून त्यांनी आत्महत्या केल्याची घटना आज (मंगळवारी) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर राहुल म्हैसमाळे (वय २२) आणि साक्षी बाबासाहेब शेजवळ (वय १८) (दोघे रा. जांबरगांव, ता. वैजापूर) असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. मृत साक्षी ही विनायकराव पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तर सागर याचा चप्पल विक्रीचा व्यवसाय होता. गेल्या काही महिन्यांपासून दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांच्या घरच्या मंडळीकडून लग्नाला विरोध असल्याने ते चालढकल करीत होते.

सोमवारी (दि.२) दुपारी साक्षीच्या वडिलांनी तिला कॉलेजमधून घरी आणले होते. मात्र त्यानंतर साक्षी घरातून बेपत्ता झाल्याने कुटुंबीयाने सर्वत्र तिचा शोध घेतला परंतु ती सापडली नाही. मंगळवारी सकाळी लाडगाव रस्त्यावर रोठी वस्तीजवळच्या खंबाळा शिवारातील लिंबाच्या झाडाला एकाच ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेतील दोघांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक रामहरी जाधव, गुणवंत थोरात यांनी घटनास्थळी धाव घेवून दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात हलविले. याप्रकरणी पोलिस पाटील अर्जुन साठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार एस.के.धादवड करीत आहेत.

लग्नाच्या काळजीने दोघेही चिंतातूर
साक्षीला पाहण्यासाठी स्थळ आले होते. आपले लग्न दुसऱ्या मुलासोबत होणार या काळजीने साक्षी आणि सागर दोघेही चिंतातूर झाले होते. साक्षी आणि सागर यांनी आपले लग्न होणार नसल्याचे लक्षात आल्यावर आपली जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.