राहाता : शिर्डीत तीन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील इंदूरच्या दीप्ती सोनी ही महिला बेपत्ता झाल्याच्या प्रकरणी शिर्डी तसेच अहमदनगर पोलिसांच्या तपासावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, शिर्डी शहरातून व्यक्ती बेपत्ता होण्याचे प्रमाण बघता मानवी तस्करी तसेच अवयव चोरीची टोळी कार्यरत आहे का, अशी शंका उपस्थित करत याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांनी लक्ष घालण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे.

शिर्डीत साई दर्शनासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील इंदूर येथील महिला भाविक दीप्ती मनोजकुमार सोनी (३९) १० ऑगस्ट २०१७ मध्ये बेपत्ता झाल्या असून याबाबत महिलेचे पती मनोजकुमार प्रेमनारायण सोनी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच तेव्हापासून वारंवार पाठपुरावा केला मात्र पोलिसांना अद्यापही यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी दोन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर बेपत्ता व्यक्तीचा  शोध घेण्याबरोबरच मानवी तस्करी किंवा अवयव तस्करी तर नाही ना, अशी शंका उपस्थित करत तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश शिर्डी पोलिसांना दिले आहेत. मात्र पोलीस अजूनही काही विशेष करू शकले नाही. शिर्डी पोलिसांनी नुकताच सादर केलेला अहवाल देखील डोळ्यात धूळ फेकणारा असून जिल्हा पोलीसप्रमुखही तपासात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

आतापर्यंत  २७९ व्यक्ती बेपत्ता झाल्या असून यातील ६७ व्यक्तींचा शोध अद्यापही लागला नाही. या प्रकरणात नव्याने पदभार घेतलेले जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी लक्ष घातले असून महिलेचा पती सोनी यांच्यासोबत शिर्डी कार्यालयाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांची समक्ष भेट घेऊन तपास केला जाईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता उपविभागीय पोलीस अधिकारी सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिसांचे पथक इंदूर येथे रवाना होणार आहे.