घशाचे नमुने तपासणी सुविधेची क्षमता वाढवण्याची जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही

पालघर : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून तपासणीचे प्रमाण वाढविले असल्याने करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील घशाचे नमुने तपासणी करण्याच्या सुविधेची क्षमता येता दहा-बारा दिवसांत वाढवण्यात येणार असून अधिकाधिक तपासणी केल्यास या आजारावर लवकर नियंत्रण ठेवणे शक्य होईल,  असे पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी प्रतिपादन केले.

गेल्या आठ- दहा दिवसांपासून जिल्ह्यात दररोज साडेचारशे ते पाचशे घशाच्या नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येत असून त्यामुळे संसर्ग होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाली आहेत. पूर्वी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दररोज सरासरी ५० ते ६० रुग्ण नव्याने आढळत असताना सध्या शंभर ते सव्वाशे जणांना दररोज नव्याने संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे.  करोनाबाधितांच्या उच्च जोखीम संपर्कातील नागरिकांची तपासणी करण्यावर भर दिला जात असून पालघर, डहाणू वाडा तालुक्यातील आजाराचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. डहाणू येथील प्रयोगशाळेत या आठवडाअखेरीस ऑटो पीसीआर हे यंत्र दाखल होणार असून येत्या दहा-बारा दिवसांत डहाणूच्या प्रयोगशाळेत प्रतिदिन पाचशे नमुन्यांचे परीक्षण करणे शक्य होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची  संख्या देण्याचे जिल्हा प्रशासनाने सुरू केले असून त्यामुळे रुग्णसंख्या सर्वसामान्यांपर्यंत माहिती झाल्यास आजाराकडे गांभीर्याने बघणे, लोकांमध्ये जनजागृती होण्यास मदत होईल. सध्या मोखाडा, जव्हार, विक्रमगड व वाडा या तालुक्यांमधील रुग्णसंख्या वाढीचा दर कमी झाला असून या आठवडाअखेरीस उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या एकेरी आकडय़ावर येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला.

पालघर जिल्ह्याच्या तसेच ग्रामीण भागातील रुग्णवाढीचा दर हा राज्य व देशाचा रुग्णवाढीच्या दरापेक्षा निम्मा असल्याची माहिती देण्यात आली. हा दर नियंत्रणास आणण्यास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मृत्यूदर कमी असला तरी रुग्णांनी लवकर उपचार सुरू केल्यास त्यांच्यावरील संकट कमी होऊ  शकेल. जिल्ह्यातील विविध उपचार केंद्रावर आवश्यक असणारी औषधे व  लशी तिथेच खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असून आवश्यक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. औषधांचा यांचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची तपासणी

जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेत असलेल्या तसेच बँक कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार व इतर सार्वजनिक क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची जव्हार, विक्रमगड व वाडा तालुक्यांत सर्वसाधारण तपासणी हाती घेण्यात आली असून आजाराचा समाजामध्ये सामूहिक प्रसार झाला नसल्याचे या तपासणी अहवालावरून निदर्शनास आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पत्रकारांना पालघर येथे दिली.