देश सध्या रामभरोसे असल्याचं म्हणत शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील मोदी सरकारवर निशाणा साधला होता. ‘या देशात सरकार, प्रशासन, प्रधानमंत्री, आरोग्यमंत्री आहेत. पण ज्याप्रकारे मृत्यू होत आहेत. गंगा नदीत हजारोंच्या संख्येने मृतदेह मिळत आहेत, हाहाकार माजला आहे ते पाहता देश रामभरोसे आहे,’ अशी टीका करणाऱ्या राऊतांवर आता भाजपाने पलटवार केला आहे. ‘राऊतसाहेब डोळे उघडा…’ म्हणत भाजपाने राऊतांना सवालही केला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना देशातील परिस्थितीवर भाष्य केलं होतं. राऊत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं होतं. राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

राऊतांवर टीका करताना केशव उपाध्ये काय म्हणाले?

‘हा देश रामभरोसे चालत आहे- संजय राऊत.’ राऊतजी एवढे अगतिक का? घरबसल्या आभासी कारभार करणाऱ्या उद्धव ठाकरे नेतृत्वाखालील सरकारला असे आडून टोमणे मारणे त्यांच्यातील राजकारण्याला शोभत असले, तरी त्यांनी आपल्यातील पत्रकाराला जाब विचारला पाहिजे. राज्याचा आंधळा कारभार पाहण्याएवढा डोळसपणा त्यांच्यातील पत्रकाराने तरी दाखविला पाहिजे. राऊतसाहेब, डोळे उघडा… देशात कोरोनाचा हाहाःकार उडाला त्यात सर्वाधिक महाराष्ट्राचा वाटा आहे हे कस विसरून चालेल? या कठिण परिस्थितीत जनतेला मदत करण्याऐवजी मंत्री अधिकाऱ्यावरून भांडत आहेत, पीआर कंत्राट दिली जात आहेत… किती यादी सांगू?,” असं म्हणत उपाध्ये यांनी राऊतांना सवाल केला आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते?

“प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतही परिस्थिती वाईट आहे. तिथे सुद्धा ऑक्सिजनअभावी लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे पंतप्रधान, गृहमत्री, आरोग्यंत्री, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अहंकार आणि राजकारण विसरुन एकमेकांशी चर्चा करत एकत्र काम केलं तरच देशातील स्थिती सुधारु शकते. प्रधानमंत्री, केंद्र सरकार जागेवरच आहे, पण त्यांचं अस्तित्व दिसणं महत्त्वाचं आहे. अदृश्यपणे काम करुन चालणार नाही. हा देश सध्या संकटाच्या काळात फक्त रामभरोसे पद्धतीने सुरु आहे. ज्या पद्धतीने गंगा, यमुनेत प्रेतांचा खच पडलेला आहे, मृतदेह वाहून येत किनाऱ्यावर लागली आहेत. त्यांच्यावर व्यवस्थित अंत्यसंस्कार ही करता येत नाही. हे असं याआधी देशात कधीच झालं नव्हतं,” असं राऊत म्हणाले होते.