धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संधिसाधू भूमिकेबद्दल आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड गप्प का, असा सवाल मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचने केला आहे. या प्रश्नी पूर्वी घेतलेल्या भूमिकेबद्दल पिचड अजूनही ठाम असतील तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा आणि आमदारकीसह मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी धनगर आरक्षणप्रश्नी घेतलेल्या संधिसाधू वृत्तीचा जाहीर निषेध करावा, अशी मागणीही या संघटनांनी केली आहे.
धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली आहे. पवार यांनी या भूमिकेचे जाहीर समर्थन केले आहे. या पाश्र्वभूमीवर या संघटनांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. धनगर आरक्षणविरोधात अकोल्यात मोर्चा काढून विरोधी भूमिका घेणाऱ्या मधुकर पिचडांचा आवाज आता राष्ट्रवादी विरोधात का उठत नाही की स्वत:ची मंत्रिपदाची खुर्ची वाचविण्यासाठीच ते गप्प आहेत काय, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
आरक्षणाच्या प्रश्नावर पिचड यांनी अकोल्यात आदिवासी समाजाच्या बाजूने मोर्चे काढायचे आणि ज्या राष्ट्रवादीचे आयुष्यभर झेंडे त्यांनी वाहिले त्या पक्षाने व त्यांचे नेते शरद पवार यांनी धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती देण्याचे समर्थन करायचे हा दुटप्पीपणा आदिवासी युवकांच्या लक्षात आला आहे. या संधिसाधूपणाच्या विरोधात लढा तीव्र करण्याचा इशारा डॉ. अजित नवले, मारुती मेंगाळ, एकनाथ मेंगाळ, नामदेव भांगरे आदींनी दिला आहे.
आदिवासी कृती समितीचीही टीका
शरद पवार यांनी विधानसभा निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून राजकीय स्वार्थापोटी धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सवलती मिळाव्यात या मागणीचे समर्थन केले आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळणाऱ्या या नेत्याचे किती राजकीय अध:पतन झाले आहे, हेच यातून स्पष्ट होते अशी टीका आदिवासी कृती समितीने केली आहे. त्यांनीही आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी समितीच्या वतीने एम. एम. लांघी, ज्ञानेश्वर झडे, डॉ. विजय पोपेरे, डॉ. किरण लहामटे, काशिनाथ साबळे, विजय पिचड, शांताराम उघडे आदी कार्यकर्त्यांनी केली आहे.