तिवरांची कत्तल, मातीच्या भरावामुळे किनाऱ्याची धूप

नितीन बोंबाडे, लोकसत्ता

डहाणू : वाणगाव रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या कापशी गावातून जाणारी खाडीलगत तिवरांच्या झाडांची बेसुमार कत्तल आणि मातीचा भराव यामुळे खाडीची प्रचंड धूप झाली आहे. त्यामुळे  वाणगाव रेल्वे मार्गाच्या मुखाजवळ कापशी खाडीने पारंपरिक मार्ग बदलला आहे.   पावसाळ्यात रेल्वे खाडी पूल क्रमांक १६१ जवळ जीर्ण पुलाला धोका वाढला आहे.

डहाणू समुद्राच्या भरतीचे पाणी माटगाव, धूमकेत, आसनगाव, वाणगाव, कापशी, डेहणे, पळे, येथे खाडीमार्गाने आजूबाजूच्या खाजण परिसरात पसरते. मात्र वाणगाव परिसरात अनेक मोक्याच्या जागी खाजण जागेत मातीचा भराव करून भरतीच्या पाणी पसरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परिणामी नेसर्गिक पद्धतीने  पावसाचे पाणी पसरण्यास मज्जाव होऊन भरतीचे पाणी वाणगाव परिसरात पसरत आहे.  तलाईपाडा, कासपाडा, स्टेशन पाडा, अत्री अपार्टमेट, दुबलपाडा या भागाला काही वर्षांपासून पुराचा सामना करावा लागत आहे. तर थोडय़ाशा पावसातही गावात पाणी शिरू लागले आहे. तर मातीच्या भरावामुळे कापशी गावाजवळील खाडीत भराव होऊ लागल्याने खाडीचा सरळ मार्ग बदलून वक्र झाला आहे. परिणामी भरतीचे आणि पुराचे पाणी या वक्रमार्गामुळे रेल्वे पूल क्रमांक १६१च्या पुलाखालून जाण्याआधी रेल्वेच्या भरावावर आदळत आहे. परिणामी पूर परिस्थितीत रेल्वे लाइनच्या वरून पाणी वाहून जात असल्याने रेल्वे मार्गाला धोका निर्माण झाला आहे.

वाणगावमध्ये खाजन जागेत भराव केल्यामुळे पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होऊन तलाईपाडा, कासपाडा, स्टेशन पाडा , अत्री अपार्टमेट, दुबलपाद्यात पाणी शिरते. तर रेल्वे पूल क्रमांक १६१ जवळ पुलाला धोका निर्माण झाला आहे. तरी प्रशासनाने लक्ष घालून यावर उपाययोजना राबविण्याची गरज आहे.

– कॅप्टन सत्यम ठाकूर, अध्यक्ष  पालघर युवक काँग्रेस</strong>