कोपरगाव : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून  आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संजीवनी ग्रुपमध्ये सदस्य असणाऱ्या माधव गुरूजी याने  रसूल का चरित्र भाग ६ हे नाव असलेल्या व्हिडिओमध्ये  एका धर्माविरुद्ध अपशब्द वापरून आक्षेपार्ह  चित्रफीत  प्रसारित करून धार्मिक भावना  दुखावल्या, तसेच आरोपी क्रमांक दोन बाबुभाई अब्दुलभाई सय्यद याने धार्मिक भावना चित्रफीत काढण्याबाबत आरोपी क्रमांक एक याला सूचना दिली नाही,  त्यांना ग्रुप मधून काढून टाकले नाही, तसेच आक्षेपार्ह व्हिडिओबाबत  पोलीस स्टेशनला माहिती दिली नाही, त्यामुळे निष्काळजीपणा  केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी  आय्युब कादरभाई शेख (५८) एकता कॉलनी, बैल बाजार रोड, कोपरगाव  यांनी कोपरगाव शहर  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून दोन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ बाबुभाई अब्दुलभाई  सय्यद या आरोपीस अटक केली.