चालू गळीत हंगामात जे साखर कारखाने उचित व लाभदायक मूल्यानुसार (एफआरपी) उसाला पहिला हप्ता देणार नाहीत, त्यांच्या संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली. साखरेचे दर पाडायला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी संबंधित सट्टेबाजच जबाबदार असून, भाजप सरकारला शेतक-यांमध्ये बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला.
स्वाभिमानीच्या वतीने बाजार समितीच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या ऊस व दूध परिषदेत खासदार शेट्टी बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, युवा आघाडीचे अध्यक्ष रविकांत तुपकर, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार दौलतराव पवार, दशरथ सावंत, अंबादास कोरडे, भाजपचे नेते हेरंब औटी, शिवसेनेचे लहू कानडे, खंडकरी नेते अण्णासाहेब थोरात आदी उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे कृषिमंत्री असताना एफआरपी कायद्याची मोडतोड करण्यात आली. त्यांचे पुतणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेवर असताना त्यांनी कायदा धाब्यावर बसवून कारखान्यांनी जादा दर देऊ नये, अशी तंबी दिली होती. साखरसम्राट आमदार व मंत्र्यांची सत्ता होती. त्यामुळे ऊसदराचे म्हणणे मांडण्यासाठी आंदोलन करावे लागत होते. आता जयसिंगपूरला ऊस परिषद झाल्यानंतर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन करण्याची गरज पडणार नाही, असे आश्वासन देऊन ऊस नियंत्रण मंडळाची स्थापना केली. भाजपच्या १२२ आमदारांमध्ये केवळ आठ साखर कारखानदार आहेत. त्यामुळे आता कारखानदारांऐवजी शेतक-यांना न्याय मिळण्याची अपेक्षा वाढल्याचे ते म्हणाले.
सांगली व कोल्हापूरच्या कारखान्यांनी उसाला पहिला हप्ता २ हजार २०० रुपये दिला आहे. पण नगर जिल्ह्यातील कारखाने तो द्यायला तयार नाहीत. नगरचा साखर उतारा कमी असल्याचे सांगितले जाते. पण जिल्ह्यातील साखरसम्राट एक टक्का रिकव्हरीची चोरी करीत असून टनाला २७० रुपये अध्यक्षाच्या घरात जात आहेत, तर ९८ रुपये सरकारला चुना लावला जातो. त्यामुळे आता खासदार निधीप्रमाणे साखर कारखान्यांवर आमदार निधीतूनही संगणक वजनकाटे बसवायला परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. तसेच काटा मारणा-या कारखानदारांना तुरुंगात पाठवावे म्हणून सरकारकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    चंद्रकांत उंडे यांनी स्वागत केले. या वेळी तुपकर, प्रकाश देठे, प्रभावती घोगरे, अंबादास कोरडे यांची भाषणे झाली. परिषदेस विठ्ठल शेळके, ज्ञानेश्वर सोडणार, रवींद्र मोरे, राम पटारे, भास्कर थोरात, भरत आसणे, सदा कराड आदी उपस्थित होते.