कृष्णा नदीपात्रातील मगरीने १४ वर्षीय सागरचा मृतदेह आज सकाळी सापडला आहे.  तब्बल 40 तासांनी त्याचा मृतदेह शोधण्यात यश आलं.  वन विभाग आणि बोट क्लबच्या वतीने सागर डंक या 14 वर्षीय मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरु होता. कृष्णा नदीत पोहण्यास गेलेल्या मुलावर मगरीने हल्ला करत त्याला खोल पात्रात ओढून नेण्याची घटना सांगलीच्या पलूस मधील ब्रह्मनाळ गावी शुक्रवारी घडली होती, त्यानंतर आता या मुलाचा मृतदेह सापडल्याने कृष्णातीर धास्तावला आहे.

कर्नाटकातील सागर डंक हा उन्हाळी सुट्टीसाठी मामाकडे आला असता शुक्रवारी दुपारी मामासोबत शेळ्या चारण्यासाठी कृष्णाकाठी गेला होता. चौदा वर्षांचा सागर कदुपारी पोहण्यासाठी नदीत उतरला होता. मात्र, काठावरच पोहणा-या सागरला तोंडात धरुन मगर नेत असताना आरडाओरड सुरू केला. मात्र, कोणीही काहीच करु शकले नाही. या वेळी नदीकाठला असलेल्या लोकांनीही मगर बराच वेळ तोंडात सागरला घेऊन नदीपात्रात फिरत असलेली पाहिली.

ही घटना समजताच, वनविभागाचे कर्मचारी बचावकार्य करत होते. मात्र, शनिवारी संध्याकाळपर्यंत सागरचा शोध लागला नव्हता. गावातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संदीप राजोबा आणि गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्तेही शोध मोहिमेत कार्यरत होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात सांगलीतील वसंतदादा समाधिस्थळी ७० जणांच्या घोळक्यात मगर शिरल्याने पोहणा-यांच्यात धास्ती निर्माण झालेली असतानाच मुलाला मगरीने ओढून नेल्याची घटना घडल्याने नदीकाठ प्रचंड धास्तावला आहे.