लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील सट्टाबाजारात मोठी उलाढाल होत असल्याची माहिती या बाजाराशी संबंधित सूत्रांनी दिली. शहरासह जिल्ह्यात तब्बल २२ ते २५ बुकी या व्यवसायात गुंतले असले, तरी हा व्यवहार अत्यंत गोपनीय असल्याने पोलीसही चक्रावले आहेत.
क्रिकेट असो अथवा फुटबॉल, विधानसभेची निवडणूक असो वा लोकसभेची, सट्टाबाजार अटळ आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून सट्टाबाजार तेजीत असला, तरी होणारी कारवाई मात्र तुटपुंजी आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सध्या सट्टाबाजारात कोटय़वधींची उलाढाल होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यातच नव्हे, तर देशाच्या वेगवेगळ्या भागात हा बाजार तेजीत आहे.
लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या वाहिन्यांचे, संस्थांचे सर्वेक्षणानंतरचे अंदाज काही असले, तरी सट्टाबाजारात भाजपला चांगला भाव आहे. भाजप सर्वाधिक जागा मिळवेल, काँग्रेस देशभरात ७५ च्या पुढे जाणार नाही, तसेच मोठा गाजावाजा करून मैदानात उतरलेल्या आम आदमी पक्षाला जेमतेम ४-५ जागा मिळतील, असा सट्टाबाजारातील एक अंदाज आहे. कोण किती जागा जिंकणार? त्यावर पसा लावल्यानंतर कोणाला किती रक्कम मिळणार याचे आकडे दररोज बदलत आहेत.
जिल्ह्यात २२ ते २५ बुकी आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांतील म्हणजे डॉक्टर, प्राध्यापक, व्यापारी, सधन शेतकऱ्यांनी या व्यवसायात मोठा पसा गुंतवला आहे. सट्टाबाजार अनधिकृत असला, तरी पोलिसांना मात्र कारवाई करण्यास मर्यादा येत आहेत. या बाजाराचे सर्व व्यवहार मोबाईलद्वारे होत असल्याने कारवाई कशी करावी, हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुकी संदर्भातली माहिती गोळा केली. पण छापा कसा व कुठे टाकावा, हे त्यांना उमगलेच नाही. गेल्या २० दिवसांपासून सुरू झालेला हा सट्टाबाजार अजूनही तेजीत आहे.