मोहन अटाळकर

करोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या तयारीला प्रशासकीय पातळीवर सुरुवात झालेली असताना शिक्षक संघटनांनी संपर्क अभियान गतिमान केल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. या वेळी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी दिसून आली आहे.

शिक्षक मतदारसंघातील निवडणूक जुलै महिन्यात अपेक्षित होती. शिवसेनेचे नेते आणि शिक्षक आघाडीचे संस्थापक प्रा. श्रीकांत देशपांडे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यापूर्वी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे वसंत खोटरे यांनी या मतदारसंघाचे सलग दोन वेळा प्रतिनिधित्व केले होते. या वेळी श्रीकांत देशपांडे हे निवडणुकीसाठी सज्ज आहेतच. त्यांना आव्हान देण्यासाठी विविध शिक्षक संघटनांचे नेते तयारीला लागले आहेत. सोबतच राजकीय पक्षदेखील पुढे सरसावले आहेत.

विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, पी.आर. पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशनचे उपाध्यक्ष दिलीप निंभोरकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे प्रकाश काळबांडे, शिक्षण संघर्ष संघटनेच्या संगीता शिंदे, शिक्षक महासंघाचे शेखर भोयर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राजकुमार बोनकिले, विज्युक्टाचे प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, शिक्षक संघाचे अ‍ॅड. किरण सरनाईक, पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विकास सावरकर, महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे प्रा. नीलेश गावंडे आदींनी निवडणुकीसाठी तयारी चालवली आहे. विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा सहा वर्षांचा कार्यकाळ १९ जुलै रोजी संपला.

करोना संकटापूर्वी निवडणूक विभागाने मतदार याद्या तयार करण्याचे काम विभागीय स्तरावरून सुरू केले होते. तसेच इच्छुक उमेदवारांनीसुद्धा मतदार नोंदणी सुरू केली होती.  शाळांच्या सट्टय़ांमुळे उमेदवारांना शिक्षकांपर्यंत आपली भूमिका पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करावा लागत आहे.

शिक्षक संघटनांची भूमिका महत्त्वाची

शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीत राज्य शिक्षक परिषद, शिक्षक आघाडी, शिक्षक महासंघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना, विदर्भ ज्युनिअर टीचर्स असोसिएशन (विजुक्टा), भाजप शिक्षक आघाडी, विभागीय शिक्षक संघ, शिक्षक सेना आदी शिक्षक संघटनांची भूमिका महत्त्वाची ठरत असते. नुटा या संघटनेने शिक्षक मतदारसंघात आजवर लढत दिलेली नाही; पण या संघटनेचा पाठिंबा कुणाला मिळतो, याचे औत्सुक्य असते.

शिक्षक मतदारसंघातील गेल्या निवडणुकीत एकूण १७ उमेदवार रिंगणात होते.  गेल्या निवडणुकीत सोळाव्या फेरीअखेर शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष अ‍ॅड. अरुण शेळके यांचा ४ हजार ९४२ मतांनी पराभव केला होता. गेल्या वेळी ‘नुटा’ आणि ‘विज्युक्टा’ या दोन प्रमुख संघटनांनी कोणत्याही उमेदवाराला समर्थन देण्याऐवजी सदसद्विवेकबुद्धीने मतदान करण्याचे आवाहन केले होते. अनेक उमेदवारांनी पहिल्या पसंतीचे मत देणे शक्य झाले नाही, तरी दुसऱ्या पसंतीचे मत तरी निश्चित द्या, असा आग्रह मतदारांकडे धरला होता. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातील दुफळीने वसंत खोटरे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या. ‘नुटा’चे समर्थन मिळवण्यात ते यशस्वी होऊ शकले नव्हते. दुसरीकडे अरुण शेळके यांनी ‘सुक्टा’ आणि प्राचार्य फोरमसारख्या अनेक संघटनांचा पाठिंबा मिळवला खरा, पण शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी निवडणूक लढवणे हे माजी अध्यक्ष वसंत धोत्रे यांच्यासह अनेकांना रुचलेले नव्हते. या निवडणुकीत मात्र शिक्षक संघटनांसोबतच राजकीय पक्षांच्या भूमिकेलाही महत्त्व राहणार आहे.

गेल्या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या ४४ हजार ६१५ इतकी होती. या वेळी ३४ हजारांवर शिक्षक मतदारांची नोंद झाली आहे.