जनतेच्या संरक्षणासाठी सज्ज असलेले पोलीस कर्मचारीच निर्घृण खुनात सामील होत असल्याचे येथे विहिरीत एकाचा मृतदेह आढळून आल्यानंतर समोर आले! लाला लजपतराय नगरातील या विहिरीत रवी प्रकाश डोईफोडे (वय ३०) याचा मृतदेह आढळून आला. या खूनप्रकरणी वाशिमची पोलीस शिपाई उषा मुंढे हिला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या प्रकरणात अन्य एक महिला पोलीस व एका पोलिसाचा सहभागही उघड झाल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे.
लाला लजपतराय नगरमधील विहिरीत गेल्या सोमवारी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याच्या छातीवर, पाठीवर, तसेच गुप्तांगावर जबर मारहाण करून गळ्याला व पायाला दोरीने बांधून जीवे मारून नग्नावस्थेत मृतदेह विहिरीत फेकून दिला होता. या ठिकाणी काही मुले क्रिकेट खेळत असताना चेंडू विहिरीत पडला. चेंडू काढण्यासाठी एक मुलगा गेला असता हा प्रकार उजेडात आला.
विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सुनील लांजेवार, उपनिरीक्षक विवेक सोनवणे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला जिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनास पाठविला. परंतु मृताची निर्घृण हत्या झाल्याने दुसऱ्या दिवशी मृतदेह नांदेडला शवविच्छेदनासाठी पाठविला. विवेक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून िहगोली पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.
विहिरीत नग्नावस्थेत सापडलेला मृतदेह शहरात सर्वत्र चच्रेचा विषय ठरला. येथील प्रकाश बांगर यांना छायाचित्रावरून मृताची ओळख पटली. मृत व्यक्ती अकोला येथील रवी प्रकाश डोईफोडे असून, तो आपला नातेवाईक असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर या प्रकरणी तपासाला वेग आला. पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक लांजेवार व उपनिरीक्षक सोनवणे यांनी मृत रवीशी संबंधीत मंडळींचा शोध सुरू केला व वाशिम येथील पोलीस शिपाई उषा मुंढे हिला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर पहिल्या दिवशी मुंढे हिने माहिती देण्यास टाळाटाळ केली. गुरुवारी पोलिसांच्या हायटेक तपासाव्दारे तिचे तोंड उघडले. तिने खून प्रकरणात सहभागाची कबुली दिली. तिच्यासह अन्य एक महिला पोलीस व पुरूष पोलीस कर्मचारी या प्रकरणात सामील असून, िहगोलीतील दोन आरोपींचा यात समावेश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या निर्घृण खुनामागील कारणाचा मात्र अजून उलगडा झाला नाही. या प्रकरणातील अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस शिपाई मुंढे हिला शुक्रवारी िहगोलीच्या न्यायालयात उभे केले असता ७ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दोन दिवसांतच या खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले. इतर आरोपींना ताब्यात घेण्यासाठी उपनिरीक्षक सोनवणे यांचे पथक वाशिम, अकोला येथे रवाना झाले. हे खूनप्रकरण वाशिम येथील आयूडीपी कॉलनीमध्ये २४ मेच्या रात्री मुख्य आरोपी उषा मुंढे हिच्या घरी घडले. नंतर मृतदेह िहगोलीतील लाला लजपतराय नगरमधील विहिरीत टाकण्यात आला. गुरुवारी हे प्रकरण उजेडात आले.