तौक्ते चक्रीवादळाच्या फटक्यामुळे मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास भाईंदर पश्विम परिसरातील शिवम कॉपरेटिव्ह या इमारतीचा मोठा भाग खचला असल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन विभागाकडून बचाव कार्य राबवण्यात आले असून ७२ हून अधिक नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तर अद्यापही कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भाईंदर पश्विम परिसरातील शिवसेना गल्ली जवळ तीन मजली शिवम को-ऑपरेटिव्ह इमारत आहे. ही इमारत तीस वर्षाहून अधिक जुनी असल्यामुळे काही महिन्यापूर्वीच पालिका प्रशासनाकडून धोकादायक ठरवण्यात आली होती.मात्र तरी देखील इमारतीत तीस हुन अधिक कुटूंबीय वास्तव्य करत होते.तौक्ते चार्क्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला लागला असल्यामुळे सोमवारपासून मिरा भाईंदर शहरात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडत आहे.

मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास शिवम इमारतीचा बाहेरील भाग खचला असल्याची घटना घडली. या घटनेची माहिती प्रशासनाला प्राप्त होताच अग्निशमन यंत्रणा तात्काळ घटना स्थळी दाखल झालेआणि बचाव कार्यास सुरुवात करून तीन तासानंतर ७२ हून अधिक नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तसेच इमारतीत कोणी अडकलेले आहे की नाही याचा शोध घेतला जात असून अद्यापही कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.