नगर : महापालिका व स्वयंसेवी संस्थांच्या वतीने शहरात सुरू करण्यात आलेल्या ‘कोविड केअर सेंटर‘ची आरोग्य समन्वय समितीने आज, शनिवारी अचानक पाहणी व तपासणी केली. या तपासणीत नटराज हॉटेल येथील सेंटरमध्ये तब्बल ५० प्राणवायू सिलिंडर महिन्यापासून वापराविना पडून असल्याचे आढळले. याबरोबरच या सेंटरमधून आवश्यक औषधांचा व मनुष्यबळाचा तुटवडा असल्याचेही आढळले.

करोना रुग्णसंख्या नगर शहरात मोठय़ा प्रमाणावर आढळत असल्याने उपचार व सुविधांमध्?ये समन्वय निर्माण करण्यासाठी महापालिकेने आजी—माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांंची आरोग्य समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे, माजी नगरसेवक निखिल वारे, सतीश शिंदे आदींनी नटराज हॉटेल व पितळे वसतिगृहाला भेट देत तेथील सेंटरची पाहणी केली.

नटराज हॉटेल केंद्रामध्ये गेल्या सुमारे महिनाभरापासून प्राणवायूचे ५० सिलिंडर वापराविना पडून आहेत. या केंद्रात प्राणवायू वापरला जावा यासाठी सुविधा नाहीत. तरीही हे सिलिंडर्स तेथे आणून ठेवले गेले होते. करोना रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेले ‘फैबीफ्ल्यू‘ ही औषधेही तेथे उपलब्ध नव्हती. आयुर्वेदिक पर्यायी औषधांचा वापर केला जात होता, डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी होते मात्र त्यांचे आवश्यक संख्याबळ उपलब्ध नाही. रुग्ण घरी गेल्यानंतर त्याची जागा ‘सॅनिटाईज‘ करण्याची  व्यवस्था नाही. या सर्व बाबी समितीचे अध्यक्ष डॉ. बोरुडे यांनी मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आणल्या. तसेच यासंदर्भात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून औषध खरेदी करण्याची मागणीही आयुक्तांकडे केली. मनपाच्या प्रत्येक कोविड सेंटरमध्ये प्राणवायूची सुविधा असणाऱ्या २० खाटा उपलब्ध करण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासनाची बैठक घेऊन आरोग्यसेवेच्या उपाययोजना केल्या जातील. आ.संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या नेतृत्वाखाली मनपा आरोग्य समिती करोना रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे डॉ. बोरुडे यांनी सांगितले.

रुग्णालयांचे ‘ऑडिटर्स‘ गायब—वारे

खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून अवाजवी बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयात ‘ऑडिटर्स‘ नियुक्त केले आहेत. मात्र हे ऑडिटर्स रुग्णालयात थांबत नाहीत, ते कुठे बसतात याची माहिती रुग्णांना नसते. त्यामुळे या ऑडिटर्सनी रुग्णालयात फलक लावून तेथेच थांबावे, अशी मागणी माजी नगरसेवक वारे यांनी केली.