डहाणूत ४० विद्यार्थ्यांना समुद्रात सहलीसाठी घेऊन गेलेली बोट उलटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील के. एल. पोंडा या हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची सहल गेली होती. ४० विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली ही बोट समुद्रात २ नॉटिकल अंतरावरच उलटली आणि बुडाली. या घटनेत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती ‘एएनआय’ने ट्विट केली आहे.

बोट उलटल्याची  माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत ३२ विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले आहे. आजूबाजूला असलेल्या बोटी तातडीने या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी या ठिकाणी गेल्या. ४० विद्यार्थ्यांमध्ये मुलींचाही समावेश आहे. तसेच हे सगळे विद्यार्थी ११ वी आणि १२ वीमध्ये शिकणारे आहेत अशीही माहिती समोर आली आहे.

या घटनेत ज्या मुलांना पाण्याबाहेर काढण्यात आले आहे, त्या मुलांना डहाणू कॉटेज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अँब्युलन्सही आणण्यात आल्या आहेत.तसेच या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य पाहण्यासाठीही बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे.

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही बोट नेमकी का उलटली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. के. एल. पोंडा या शाळेचे विद्यार्थी या सहलीत सहभागी झाले होते. सहलीचा आनंद लुटतानाच विद्यार्थ्यांना या भयानक अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. साधारण साडेतीन किलोमीटर अंतर गेल्यावर ही बोट अचानक उलटली आहे. यामुळे विद्यार्थी पाण्यात पडले, जे लक्षात येताच इतर बोटींनी विद्यार्थ्यांची मदत केली आणि विद्यार्थ्यांना वाचवण्याचे आणि मदत कार्य सुरु केले. डहाणू पोलीस आणि कोस्ट गार्ड यांच्या मदतीने बुडालेल्या इतर मुलांचा शोध घेण्यात येतो आहे.

उत्साहाच्या भरात सहलीसाठी निघालेल्या मुलांना नेमके काय होणार आहे? याची पुसटशीही कल्पना नव्हती. मात्र अचानक झालेल्या या प्रकारामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.