सनी शरद शिंदे या अल्पवयीन दलित युवकाच्या पार्थिवावर अखेर हत्येनंतर पाच दिवसांनी शनिवारी दुपारी भारिपचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत, अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तरुणांचा मोठा जमाव उपस्थित होता. अंत्ययात्रेच्या दरम्यान जमावाने रास्ता रोकोही केला.
सनीचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळीच नगरमध्ये आणण्यात आला होता. मात्र सर्व आरोपींना अटक करण्यात यावी, तुरूंगात असलेल्या त्याचे वडील व भावाची अंत्यविधीसाठी सुटका करावी, खा. आठवले यांनी भेट घ्यावी आदी मागण्या शिंदे कुटुंबीय व उपस्थित जमाव करत होता. रिपब्लिकन पक्षाचे नेते अशोक गायकवाड, अजय साळवे, सुनिल साळवे आदी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. हत्या होऊन पाच दिवसांचा कालावधी लोटल्याने लगेच अंत्यविधी होणे आवश्यक आहे, याकडे पदाधिकारी लक्ष वेधत होते.