|| हर्षद कशाळकर

रायगड जिल्हा परिषदेच्या ५६४ शाळा सध्या नादुरुस्त झाल्या आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी या शाळांच्या इमारतीची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे धोकादायक परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे. गेली दोन र्वष इमारत दुरुस्तीचे प्रस्ताव शासनस्तरावर धुळखात पडून आहेत.

रायगड जिल्ह्यात २ हजार ७४६ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यातील ५६४ शाळा नादुरुस्त आहेत. यात अलिबाग २४, पेण ६१, पनवेल ४०, उरण १२, कर्जत ५९, खालापूर ४३,सुधागड पाली २७, रोहा ७७, माणगाव ४५, महाड ५४, पोलादपूर २०, श्रीवर्धन ३६, म्हसळा ३१,मुरुड २०, तळा १५ शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील वर्गखोल्यांच्या लाद्या उखडणे, वर्गखोल्यांना गळती लागणे, खिडक्या, दरवाज्यांची पडझड होणे, इमारतीच्या भिंतींनाही तडे जाणे, वर्गखोल्यांचे छप्पर उडणे, स्वच्छतागृहाची दुरवस्था होणे यासारख्या घटना घडत आहेत. त्यामुळे धोकादायक परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहेत. पण निधीआभावी या शाळांची दुरुस्ती होऊ शकलेली नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा नियोजन विभागाकडून या शाळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. जून महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बठकीत यावर चर्चा करण्यात आली. यानंतर शाळांच्या इमारत दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षकि योजनेतून आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र नादुरुस्त शाळांची यादीच अद्याप नियोजन विभागाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे शाळा दुरुस्तीसाठी मंजूर केलेला निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग होऊ शकलेला नाही. त्यामुळे शाळा दुरुस्तीची कामे प्रत्यक्ष सुरू व्हायला अजून तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

‘नादुरुस्त शाळांची यादी लवकरच जिल्हा नियोजनकडे पाठविण्यात येईल. निधी प्राप्त झाल्यावर ज्या शाळा मोठय़ा प्रमाणात नादुरुस्त आहेत त्या शाळांना प्रथम प्राधान्य देऊन दुरुस्त केल्या जातील.’   –  नरेश पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती