लग्नखर्चाचे वडिलांवरील ओझे कमी करण्यासाठी आपण स्वखुशीने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून लातूर तालुक्यातील भिसेवाघोली येथील २१ वर्षीय शीतल व्यंकट वायाळ या मुलीने शुक्रवारी जीवनयात्रा संपविली. नापिकी व कर्जबाजारीपणात कुटुंब अडकल्यामुळे सलग पाच वर्षांपासून तिचे लग्न रखडले होते.

व्यंकट वायाळ यांच्याकडे पाच एकर जमीन आहे. पत्नी, दोन मुले आणि तीन मुली असा त्यांचा परिवार आहे. पाच एकरांपकी दीड एकरात ऊस लावलेला, मात्र पाण्याअभावी तो करपून गेला. तीनपकी दोन मुलींचे विवाह साखरपुडय़ाच्या वेळीच उरकले. तरीही विवाहासाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा वाढतच गेला. अगोदरचे कर्ज फिटत नसल्यामुळे तिसरी मुलगी शीतलच्या विवाहाची चिंता होती. दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर आíथक अडचणीमुळे तिचे शिक्षणही सुटले. ती आईसोबत घरकाम व शेतकाम करत असे. शनिवारी सकाळी शेतावर काम करत असताना ती पाणी पिऊन येते, असे सांगून गेली. फार वेळ झाला तरी न आल्यामुळे आई, वडील व शेजारी तिच्या शोधार्थ निघाले. विहिरीतील पाण्यावर तिची चप्पल तरंगत असल्याचे दिसले. त्यानंतर हाती लागला तो तिचा मृतदेहच. शवविच्छेदनानंतर शुक्रवारी सायंकाळी शीतलच्या पाíथवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दीड वर्षांपूर्वी याच गावातील मोहिनी भिसे हिची आत्महत्याही चíचली गेली. त्यानंतर शीतलची दुसरी आत्महत्या आहे.

ते अखेरचे पत्र..  – शीतल वायाळ

मी शीतल व्यंकट वायाळ चिठ्ठी अशी लिहिते की, माझे वडील मराठा कुणबी कुटुंबात जन्मले असल्यामुळे त्यांच्या शेतात सलग पाच वर्षांपासूनच्या नापिकीमुळे आमच्या कुटुंबांची परिस्थिती अत्यंत हलाखीची व नाजूक असून माझ्या दोन बहिणींचे लग्नही ‘गेटकेन’ (साखरपुडय़ातच लग्न करणे) करण्यात आले; परंतु माझे लग्न गेटकेन करण्यासाठी दोन वर्षांपासून बापाची दरिद्री संपत नव्हती. कुठल्याही बँकेचे किंवा सावकाराचे कर्ज माझ्या बापाला न मिळाल्यामुळे माझे लग्न दोन वर्षांपासून रखडले होते. तरी मी माझे माझ्या बापावरील वजन कमी करण्यासाठी व मराठा समाजातील रूढी-परंपरा, देवाणघेवाण कमी करण्यासाठी स्वखुशीने आत्महत्या करीत आहे. तरी मला व माझ्या कुटुंबाला समाजाने कुठलाही दोष देऊ नये.